Vijay Wadettiwar and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar On Ajit Pawar : वडेट्टीवारांचे स्फोटक विधान; म्हणाले, अजितदादा 'यूज अँड थ्रो', त्यामुळे...

Atul Mehere

Nagpur Political News : एखाद्याचा वापर करायचा. आपले काम पूर्ण झाले, की त्याला दुधातल्या माशीप्रमाणे काढून फेकून द्यायचे, ही भाजपची प्रवृत्ती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर कोणता निकाल लागणार आहे, हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे भाजपने आता अजित पवार यांचा वापर सुरू केला आहे. (BJP has now started using Ajit Pawar)

अजितदादा म्हणजे भाजपसाठी 'यूज अँड थ्रो' आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाहीत, असे ठाम प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते म्हणाले की, आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर काय होऊ शकते, याची भारतीय जनता पक्षाला पूर्ण कल्पना आहे. भाजप केवळ सत्तेसाठी हपापलेली आहे.

ते सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. एकनाथ शिंदे लवकरच अडचणीत येणार असल्याने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात येत आहे. मात्र, वास्तविकता अजित पवार कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, भाजपसोबत असताना तर मुळीच नाही, असे भाकीत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

ड्रग्जबाबत सरकारच दोषी...

ड्रगमाफिया ललित पाटील याला पळवण्यामागे सरकारचाच हात आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. पाटील सापडला तर सत्ताधाऱ्यांपैकी अनेकांचे पितळ उघडे पडेल. त्यामुळे तो हाती लागू नये, असा प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

सरकारवर गुन्हा दाखल व्हावा...

समृद्धी महामार्गावरील अपघातांना सरकार कारणीभूत आहे. १२ जणांच्या जीव घेण्याला तर आरटीओचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन सरकारसह दोशी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आरोपांची चौकशी व्हावी...

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या तपासणी यंत्रणांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी. केवळ चौकशीपुरते हे प्रकरण मर्यादित न ठेवता, यासंदर्भात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT