Vijay Wadettiwar and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar on Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी ‘ते’ पाऊल स्वतःहून उचलायला पाहिजे होतं !

Atul Mehere

Vidarbha Political News : ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत अॅड. आंबेडकरांना निमंत्रण देण्याची गरज नव्हती. देशातील जातीयवादी शक्तींच्या विरोधातील तो एल्गार होता. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सहमती दर्शविणारे पाऊल स्वत:हून उचलायला हवे होते. मात्र पुढच्या बैठकीसाठी त्यांना आपल्याकडून निमंत्रण नक्कीच जाईल, असा शब्द विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. (It was Elgar against the communalist forces in the country)

मुंबईत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आले नव्हते. तेव्हा राजकीय वर्तुळात काही चर्चासुद्धा झडल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी धैर्यवर्धन पुंडकर आणि रेखा ठाकूर यांनी तेव्हा याबाबतीत वक्तव्यसुद्धा केले होते. `इंडिया’च्या बैठकीत सहभागी होण्याची वंचितची इच्छा होती. पण निमंत्रण नसल्यामुळे आम्ही गेलो नाही, असे तेव्हा वंचितच्यावतीने सांगण्यात आले होते.

सध्या काँग्रेसची (Congress) जनसंवाद यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज (ता. सात) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात दाखल झाली. यात्रेदरम्यान वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मत व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली तर डॉ. आंबेडकरांनी संविधानाची. आज संविधानावरही संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावे, अशी साद विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी घातली आहे.

कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान विजय वडेट्टीवार आज बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात होते. दरम्यान शेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त साद प्रकाश आंबेडकर यांना घातली. ‘महाराष्ट्रात सध्या अराजकता निर्माण झाली आहे. जातीयवादी शक्तींना हरविण्यासाठी प्रकाशभाऊंनी सोबत यावे’, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत निजाम काळातील नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय नवीन नाही. मराठा समाजाची दिशाभूल करणारे हे पाऊल आहे. ईडब्ल्यूएसच्या धर्तीवर सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT