Vijay Wadettiwar, Eknath Shinde and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar On Shinde, Pawar : एकनाथ शिंदे, अजित पवारांवर टीका करताना वडेट्टीवारांची जीभ घसरली !

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: विरोधी पक्षनेते पदावर काम सुरू करताच आमदार विजय वडेट्टीवार चांगलेच ‘फार्मात’ आले आहेत. संधी मिळेल तेव्हा ते सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी करतात. काल. (ता. १३) गडचिरोली येथे त्यांच्या सत्काराच्या सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

आपल्या पक्षाशी गद्दारी करणारे नेते या दोन मालकांच्या मागे कुत्र्यासारखे फिरत आहेत, अशी शेलकी टीका वडेट्टीवार यांनी केली. मी स्पष्टच बोलतो अन् कुणाला घाबरत नाही, हे बोलण्यासही ते विसरले नाहीत. जे कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करत होते, ते त्यांच्या बरोबर जाताच आता पोपटासारखे ‘नमो नमो’चा `टिवटिवाट' करत आहेत.

पाळलेला पोपट फक्त मालकाचे गाणे गातो. त्याचे पंख कापलेले असतात. जे मालकाचे दाणे खातात, त्याचे गाणे गातात आणि पिंजऱ्यात बंद करून ठेवले जातात. त्यामुळे शिंदे गट असो की अजित पवार जे भाजपसोबत गेले, ते सगळे आता पोपट झाले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

या सत्कार सोहळ्याच्या मंचावर कॉंग्रेसचे नेते पंकज गुड्डेवार, प्रा. राजेश कात्रटवार, शिवसेना (ठाकरे गट) सुरेंद्रसिंह चंदेल, अरविंद कात्रटवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश पोरेड्डीवार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आदी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले की, कॉंग्रेसच्या (Congress) काळात ३५० रुपयांना मिळणारे घरगुती गॅस सिलिंडर भाजपने ११०० रुपयांवर नेले आहे. शेतकरी बांधवांना आमच्या काळात ३८० रुपयांना मिळणारे डीएपी युरिया या सरकारने १३०० रुपयांचे केले.

पूर्वी गरीब महिलेचा संसार तीन हजारांत चालायचा या सरकारच्या काळात सहा हजारही कमी पडतात. हे सिमेंटच्या चकाचक रस्त्यांची गोष्ट करतात. पण टोल नाके बसवून तुमच्याकडूनच पैसे वसूल करणार आहेत. पेट्रोल १०० पार नेत आता मोदी पोस्टरमधून तुमच्यावर हसत असतात. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भाजपचे नेते रेल्वे आली, रेल्वे आली.. म्हणत राहतात. पण रेल्वेची शिट्टी काही ऐकू येत नाही, असे म्हणत वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्थानिक नेत्यांनाही चिमटे घेतले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT