Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar On Shinde : वडेट्टीवारांचा घणाघात; मराठवाड्यातील बैठक म्हणजे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न !

Atul Mehere

Nagpur Political News : मराठवाड्यातील समस्यांकडे राज्य सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळ व अधिकारी आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करून या प्रदेशातील प्रश्न खरच सोडवतील का, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. (Will staying in a luxury hotel really solve the region's problems?)

२०१४ मध्ये मराठवाड्यासाठी ४९ हजार ८०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्या पॅकेजचा हिशोब सरकारने द्यावा. मागील पॅकेज कचऱ्याच्या पेटीत गेले असताना नव्याने पॅकेज जाहीर करण्याची सरकारची तयारी म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखा प्रकार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत.

या भागात शेतकरी (Farmers) आत्महत्यांचे प्रमाण कायम आहे. ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशात सरकारच्या आत्महत्यामुक्त मराठवाडा (Marathwada) घोषणेचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. मराठवाड्यात केवळ मंत्रिमंडळ व अधिकाऱ्यांना आणून काहीही होणार नाही. या प्रदेशासाठी ठोस काही तरी सरकारने केले पाहिजे, असे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. (Nothing will happen just by bringing the cabinet and officials)

कंत्राटी पद्धतीने पदभरतीच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार हे दिशाभूल करणारे वक्तव्य करीत आहेत. पवारांकडून राज्यातील बेरोजगारांची फसवणूक केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. किसान संपदा योजनेतून मंत्री गावीत यांच्या कन्येच्या कंपनीला देण्यात आलेला लाभ म्हणजे मोठा गैरप्रकार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील मराठा आरक्षणाबाबत वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळ मागितली आहे. परंतु सरकारने ओबीसी समाजाचा हक्क मारून कोणालाही आरक्षण देऊ नये. राज्यातील नेत्यांच्या भेटी घेऊन आम्ही यासंदर्भात भूमिका ठरवू असे वडेट्टीवार म्हणाले. मराठा समाजाचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री जातात ही आनंदाची बाब आहे. परंतु विदर्भातील चंद्रपुरात ओबीसी कार्यकर्तेही उपाशी आहेत.

आंदोलन करीत आहेत. उपोषणकर्त्याला सहा महिन्यांचे बाळही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तेथेही जाऊन उपोषण सोडवावे. दोन समाजांत भेदभाव दिसेल, असे सरकारने वागणे अपेक्षित नाही. ओबीसी समाजाला जो साथ देईल, त्याची साथ ओबीसी समाज देईल. नागपुरात ओबीसींचा मोर्चा निघणार आहे. त्यात कोणकोण समाजाच्या साथीला येतो हे कळेलच, असे वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT