HSC English exam mass copying Sarkarnama
विदर्भ

HSC exam controversy : बारावीच्या पेपरात सामूहिक कॉपीचा महाभंडाफोड; 581 विद्यार्थ्यांची एकच उत्तरे, 26 शिक्षक निलंबित

Washim: 26 Teachers Suspended in Class 12 Physics Exam Copy Case : वाशीम जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेला सामूहिक काॅपी प्रकारामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.

Pradeep Pendhare

Washim mass copying case : वाशीम जिल्ह्यातील टो-जुमडा फाटा इथल्या श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर सोमवारी बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भरारी पथकाने सोमवारी या केंद्राची अचानक पाहणी केली.

केंद्रावरील सर्व परीक्षार्थींची प्रश्नांची उत्तरपत्रिकेत एकसारखी उत्तरे लिहिल्याचे आढळले. सदर प्रकरणात केंद्रावरील 26 शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेला दिले आहेत.

राज्यात सध्या इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून सोमवारी भौतिकशास्त्राचा पेपर होता. या परीक्षेदरम्यान वाशीम (Washim) जिल्ह्यातील टो-जुमडा फाटा इथल्या श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर 584 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 581 विद्यार्थी उपस्थित होते. भरारी पथकाने या केंद्राला सोमवारी दुपारी साडे बारा वाजता अचानक भेट दिली.

या भेटीत विद्यार्थ्यांच्या (Student) उत्तरपत्रिकांचीही पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली. या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. सर्व 581 विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे शब्दशः एकसारखी लिहिल्याचे दिसून आले. काही उत्तरपत्रिकांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांवर पेन किंवा पेन्सिलने खुणा केल्याचेही निदर्शनास आले.

पथकाला या परीक्षा केंद्रावर अनेक गंभीर असुविधा आढळून आल्यात. केंद्रावर परीक्षार्थींची बसण्याची व्यवस्था टिनशेडमध्ये व अत्यंत दाटीवाटीत करण्यात आली होती. अपुरी प्रकाशयोजना, पंख्यांची कमतरता आणि केवळ आठ सीसीटीव्ही कॅमेरे अशा त्रुटी आढळून आल्या.

परीक्षा केंद्रावर मोबाईलचा वापर

वीज खंडित झाल्यास जनरेटरची कोणतीही सुविधा नव्हती. तपासादरम्यान एक कर्मचारी मोबाईल फोन घेऊन केंद्रात फिरताना आढळला. मोबाईल तपासणीसाठी मागण्यात आला असता त्याने टाळाटाळ केली. अखेर त्याच्याकडील दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल पुढील चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

फौजदारी गुन्हा

या प्रकरणात श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावरील संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची करवाई आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

...तर प्रशासक नेमणार

वाशीमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी, टो-जुमडा फाटा इथल्या श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक कॉपीचा प्रकार आढळून आला आहे. या संदर्भात गट शिक्षणाधिकाऱ्यांना सदर संस्थेच्या 26 शिक्षकांना निलंबित करण्याची कारवाई करण्यास सांगितले आहे. शाळा व्यवस्थापनाने दोषी शिक्षकांना निलंबित केले नाही, तर सदर संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस केली जाईल, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT