Maharashtra POCSO case : वाशिममधील काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 14 अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तिसरी आणि चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवणे, अयोग्य स्पर्श करणे आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप 56 वर्षीय शिक्षक दिलीप बोरकर याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत दोन शिक्षक आणि दोन शिक्षिका कार्यरत आहेत. यातील आरोपी शिक्षक (Teacher) मागील सात ते आठ महिन्यांपासून तिसरी आणि चौथीतील काही विद्यार्थिनींना आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर विद्यार्थिनींसोबत अयोग्य वर्तन केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हा प्रकार 8 सप्टेंबर रोजी उघडकीस आला. शाळा (School) सुटल्यानंतर एक शिक्षिका घरी जात असताना काही विद्यार्थिनी रडत त्यांच्या जवळ आल्या. विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली.
यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकाकडून होत असलेल्या गैरवर्तनाची माहिती दिल्याचे समोर आले. आरोपी शिक्षक धमकी देत असल्यामुळे विद्यार्थिनी अनेक महिने भीतीच्या छायेत असल्याचा आरोप आहे. प्रकाराची माहिती मिळताच संबंधित शिक्षिकेने तत्काळ पालकांना आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.
घटना समोर आल्यानंतर काटा गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी विद्यार्थिनींकडे विचारपूस केल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले. संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून त्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक शाळेत पोहोचले. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी या प्रकरणातील 14 पीडित विद्यार्थिनींचे जबाब इन-कॅमेरा पद्धतीने नोंदवले आहेत. अल्पवयीन मुलींशी संबंधित असल्याने त्यांच्या ओळखीबाबत गोपनीयता राखण्यात आली आहे. या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.