Nana Patole Sarkarnama
विदर्भ

प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधकांशी बोलणार...

या सरकारने केलेल्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश करून जनतेला त्याची माहिती व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाने Congress Party हे जनजागरण अभियान हाती घेतले आहे.

सुरेंद्र रामटेके

वर्धा : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आज याबाबत अधिकृत घोषणा केली. विरोधी पक्षाशी चर्चा करून प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. प्रज्ञा सातव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. राजीव सातव हे काँग्रेसचे युवक नेते होते. त्यांचा सर्वांशी जवळचा परिचय होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न करणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षाशी चर्चा करणार असल्याचं नाना पटोले म्हणाले. ते वर्धेच्या सेवाग्राम येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजीत कांबळे उपस्थित होते.

काँग्रेसचे राज्यव्यापी ‘जनजागरण अभियान’ वर्धा येथून सुरू झाले आहे. जनतेमध्ये जाऊन जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने जनजागरण अभियान’ हाती घेतले असून आठवडाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोदी सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस जनतेच्या दरबारात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाला सुरुवात झाली असून वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सेवाग्राम आश्रममार्गे करंजी (भोगे) गावापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

या अभियानात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहभाग घेतला. करंजी भोगे येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व तिथेच मुक्काम केला. यावेळी त्यांच्यासोबत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, माजी मंत्री रणजीत कांबळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही सहभाग घेतला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अच्छे दिन, १०० दिवसांत महागाई कमी करू, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊन अशी भरमसाठ आश्वासने देऊन २०१४ साली मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात आले. परंतु या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला. महागाई कमी तर झालीच नाही, पण दुप्पट वेगाने वाढली, पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडर यांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवलेल्या शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार नवीन कृषी कायद्याच्या माध्यमातून करत आहेत.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली. काँग्रेस सरकारने उभ्या केलेल्या संस्था एक एक करून मित्रांना विकल्या. तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी ४५ वर्षातील सर्वात जास्त झाली. मोदी सरकार सात वर्षांत सपशेल अपयशी ठरले असून फक्त जाती धर्मात भांडणे लावून आपली सत्ता कायम कशी राहील, यावर त्यांचा भर राहिला आहे. हे सरकार आता जनतेच्या मनातून उतरले आहे. या सरकारने केलेल्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश करून जनतेला त्याची माहिती व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाने हे जनजागरण अभियान हाती घेतले आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनापासून म्हणजेच १४ नोव्हेंबर १९ नोव्हेंबरपर्यंत हे जनजागरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते प्रत्येक शहरात आणि गाव खेड्यांत लोकांच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावात मुक्काम करून लोकांशी संवाद साधतील. मोदी सरकारने जनविरोधी कामाची माहिती लोकांना देतील. या सर्व कार्यक्रमाची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवरून उपलब्ध करून दिली जाईल आणि जनजागृतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT