Praful Patel, Ajit Pawar, Nawab Malik  Sarkarnama
विदर्भ

Nawab Malik Issue : नवाब मलिकांशी अजित पवार गटाचा संबंधच नाही; प्रफुल पटेलांचे मोठे विधान

Nagpur Winter Session 2023 Praful Patel On Nawab Malik : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरून मोठा वाद रंगला आहे...

Pradeep Pendhare

Maharashtra Winter Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा आमदार नवाब मलिक यांच्याशी कुठलाही संबंध नाही. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्येही त्यांच्या नावाचा आणि प्रतिज्ञापत्राचा समावेश नाही. नवाब मलिक यांची उद्याची वाटचाल कशी असेल, याबाबत त्यांच्याशी अजित पवार गटाकडून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल विधान भवनात दाखल झाले. तिथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांच्या भेटी घेतल्या. नवाब मलिक यांच्या भूमिकेवरून त्यांना माध्यमांनी घेरले. आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे उत्तर या वेळी पटेल यांनी दिले. न्यायालयाने त्यांना वैद्यकीय जामिनावर सोडले आहे. त्यांच्याशी राजकीय चर्चा करून त्यांना अडचणीत आणू शकत नाही, अशी भूमिका पटेलांनी मांडली.

प्रफुल पटेल म्हणाले, "राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडली आणि त्यानंतर झालेल्या अंतर्गत घडामोडीवेळी आमदार नवाब मलिक कोठेच नव्हते. त्यांचा दुरान्वये संबंध नव्हता. वैद्यकीय उपचारासाठी त्यांचा जामीन झाला आहे. त्यानंतर सहकारी म्हणून आम्ही भेट घेतली. विचारपूस केली. विधानसभेत आल्यानंतर जुने सहकारी एकमेकांना भेटतात. ते स्वभाविक आहे. नवाब मलिक यांची उद्याची वाटचाल कशी असेल, याबाबत आम्ही त्यांच्याशी कोठेही चर्चा केलेली नाही. ते जामिनावर आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कोणतीह राजकीय चर्चा करू शकत नाही."

"विधानसभेत कोण कोठे बसला, हे महत्त्वाचे नाही. त्यांना विधानसभेत बसण्याचा अधिकार आहे. ते कोण-कोणाला भेटले म्हणून लगेच त्यांना कोणी पुरस्कृत केले, असा अर्थ होत नाही. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याबाबत जे पत्र लिहिले त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. नवाब मलिक कोणाकडे याबाबतचा प्रश्न निर्माण करण्याची गरज नाही. नवाब मलिक यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये भूमिका आज आणि उद्या काय असेल यावर मी भाष्य करणार नाही", असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"विरोधकांकडे महायुतीविरोधात सक्षम नेतृत्व नाही"

चार राज्यांच्या निवडणुकीत महायुतीने चांगली कामगिरी केली. तीन राज्यांत विजय मिळवला. त्यावरून देशातील विरोधक चारीमुंड्या चित झाले आहेत. विरोधक हताश झाले आहेत. त्यामुळे गैर मुद्दे उपस्थित केले जात आहेत. सहानुभूती निर्माण करू पाहत आहे. आम्हाला बदनाम करत आहेत. देशात महायुतीत आणि महाराष्ट्रातदेखील महायुतीचे सरकार येणार आहे. काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून नेतृत्व करू शकत नाही. त्यांच्याकडे ती क्षमताच नाही. देशातील विरोधक निराश आहे. लोकसभेत ते पाहिले आहे. येथेदेखील नवाब मलिक यांचा मुद्दा उपस्थित करून मुद्दे भरकटविले जात आहेत. एकनाथ, देवेंद्र आणि अजित मिळून महाराष्ट्रात नेतृत्व करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दानवे, पटोले, चव्हाणांना फटकारले

निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाने दाखल केलेल्या यादीत नवाब मलिक यांचे कोणतेच कागदपत्र नाहीत. प्रतिज्ञापत्र नाही. त्यामुळे त्यांच्याशी संबंधच येत नाही, असे सांगत पटेल अंबादास दानवे यांच्या आरोपावर संतापले. माझ्याविषयी त्यांना काहीच माहीत नाही. त्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही. माझ्याविषयी शरद पवारांनीच उत्तर दिले आहे, असे पटेल म्हणाले. तुम्हाला नवाब मलिक चालत नाही, मग प्रफुल पटेल का चालतात? असे पत्र अंबादास दानवे यांनी दिले. त्यावर पटेलांनी ही प्रतिक्रिया दिली. नाना पटोले माझ्याविषयी काही तरी बोलणारच. ते हताश आहेत. त्यांच्यावर उद्या काय संकट येणार आहेत, हे माहीत नाही. नवाब मलिक यांच्याविषयी अशोक चव्हाण यांनी सल्ला देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचा पक्ष चालवावा. फालतू सल्ला देण्याची त्यांना गरज नाही. काँग्रेसला जिंकण्यासाठी त्यांनी काम करावे, असा टोला प्रफुल पटेल यांनी लगावला.

Edited by Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT