<div class="paragraphs"><p>Sudhir Mungantiwar Reaction After Sindhutai Sapkal Death</p></div>

Sudhir Mungantiwar Reaction After Sindhutai Sapkal Death

 

Sarkarnama

विदर्भ

सिंधूताईंच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये काल रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या माई अर्थात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले, अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे. (Sudhir Mungantiwar Reaction After Sindhutai Sapkal Death)

माईंनी अनाथांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले. त्यांचे संघर्षमय आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निःस्वार्थ समाजसेवा कशी असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माई. त्यांचा प्रेमळ स्वभाव व वात्सल्यमयी व्यक्तिमत्त्व या माध्यमातून त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनात घर निर्माण केले. अनाथांची माय होताना त्यांच्या व्यथा वेदनांशी त्या एकरूप झाल्या. बेटा असे संबोधत त्यांनी अनेकांवर मायेचा वर्षाव केला. त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले. अशी भावना आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सिंधुताईंना छातीचा हार्निया झाला होता. त्यांच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. त्यांनी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्या संस्थेच्या माध्यमातून त्या अनाथ मुलांना सांभाळत असत. संस्थेत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्य़ा स्वावलंबी होतील, यासाठीही त्यांचे प्रयत्न असायचे. अनाथ आणि बेवारस मुलांना आधार देण्याचे फार मोठे काम सिंधूताई यांनी आपल्या जीवनात केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT