Tumsar APMC, Bhandara. Sarkarnama
विदर्भ

Bhandara : साहेब, कधी संपेल हो आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रशासकराज?

APMC News : तुमसर-मोहाडी येथील निवडणुकीचा कार्यक्रम रखडला; सहकार विभागावर नाराजी

अभिजीत घोरमारे

Tumsar : भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी कृषी उप्तन्न बाजार समिती गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आहे. दोन वर्षांपासून येथील बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक रखडली आहे. मोहाडी येथील बाजार समितीची निवडणूक रद्द करण्यात आली होती. आता दोन वर्षे झाले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांपाठोपाठ सहकार क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेवरही ब्रेक लागला आहे. त्यामुळे कृषी उप्तन्न बाजार समितीमधील प्रशासक राज कधी संपेल, अशा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

बाजार समितीची निवडणूक स्थगित झाल्याने येथे सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली. गेल्या दोन वर्षांपासून येथे प्रशासक राज कायम आहे. शेतकऱ्यांना आपल्या समस्या कुणाकडे मांडाव्यात असा प्रश्न पडत आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान व इतर शेतमालाची विक्री होते. समितीमधील मालाचा काटा, मालाची उलच, साठवण करताना शेतकऱ्यांना आता त्रास होत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ओरड वाढली आहे.

एकट्या प्रशासकाला येथे प्रचंड व्याप असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र तुमसर मोहाडी-तालुक्यात आहे. ही बाजार समिती धान खरेदी व तांदूळ विक्रीसाठी राज्यात अव्वल आहे. तांदळाचे कोठार हे बिरुद याच बाजार समितीमुळे जिल्ह्याला लाभले आहे. दरवर्षी येथे कोट्यवधींची उलाढाल होते. बाजार समितीचा कार्यकाल संपून दोन वर्षे झालीत. मात्र राज्य शासनाच्या सहकार विभागाने अद्यापही निवडणूक घेतलेली नाही.

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु, मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाल्याने तुमसर कृषी उप्तन्न बाजार समितीची निवडणूकही सहकार विभागाने स्थगित केली. आता ग्रामपंचायतीचर निवडणूक आटोपून दोन महिने झाले आहेत. मात्र अद्यापही बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तुमसर पंचायत समितीचे उपसभापती हिरालाल नागपुरे ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले की, बाजार समितीची निवडणूक न होणे हे अयोग्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नियमानुसार इतका विलंब केला जाऊ शकत नाही. येथे प्रशासक राज सुरू असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. आदर्श नियमावलीचे उलंघन होत आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक सहकार विभागाने लवकर घेणे गरजेचे झाले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागले. त्यामुळे आता सहकार विभाग कोणती भूमिका घेते याकडे बाजार समितीशी संबंधित वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT