Yavatmal District Bank Election News: यवतमाळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्या उमेदवारासाठी काँग्रेसच्या आमदारांनी विशेष ताकद लावली, त्यांचे नाव महाविकास आघाडीच्या अधिकृत यादीत आले. मात्र, त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता माघार घेतल्याने काँग्रेसची ऐनवेळी कोंडी झाली. परिणामी पॅनलमधील जागा रिकामी राहू नये म्हणून अपक्ष असलेले कर्मचारी नेते रवींद्र देशमुख यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर करण्याची वेळ काँग्रेसवर आली.
जिल्हा बँकेच्या कारभारावर यापूर्वी ‘असंतोष’ व्यक्त करणाऱ्या संबंधित उमेदवाराच्या उमेदवारीसाठी यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी विशेष आग्रह धरल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात होती. त्यांच्या नावाचा समावेश महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या यादीतही करण्यात आला. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला.
विशेष म्हणजे जिल्हा बँकेतील काही जागा बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर चर्चा सुरू होती. यामुळे आपला नंबर लागेल, या आशेने उमेदवारीचा आग्रह असल्याची चर्चा काँग्रेस पदाधिकारी करीत आहे. मात्र, बिनविरोधची बोलणी फिस्कटल्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू झाली. यामुळे काँग्रेसच्या ‘त्या’ नगरसेवक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येताच पॅनलची जबाबदारी असलेल्या नेत्यांची तारांबळ उडाली. उमेदवारांची जुळवाजुळव करताना वेळ कमी असल्याने अखेर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले कर्मचारी नेते रवींद्र देशमुख यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
ज्यांच्या उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर आग्रह धरला गेला, त्यांचेच ऐनवेळी माघार घेणे काँग्रेसच्या गोटात चर्चेचा विषय ठरले आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तीनेच निवडणुकीतून माघार का घेतली, याबाबत आता पक्षांतर्गत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे या माघारीची आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनाही पूर्ण कल्पना देण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पॅनलची संभाव्य अडचण दूर करण्यासाठी रवींद्र देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश आणि उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ज्यांच्यासाठी राजकीय ताकद पणाला लावली, त्यांनीच माघार का घेतली, याचे उत्तर आता काँग्रेसच्या गोटात शोधले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.