Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Yavatmal Government at Your Door : ट्रकवर चढून लोकांनी लुटल्या जेवणाच्या थाळ्या, दहा मिनिटांत संपले जेवण !

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal District CM Eknath Shinde News : यवतमाळ येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गावागावांत एसटी बसेस आणि खासगी वाहने पाठविली. त्यातून कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. मात्र, या गर्दीला जेवण पुरविण्यात अपयश आले. (Lack of planning of the administration in the 'Government at your door' program)

जेवणाच्या किट घेऊन आलेल्या ट्रकवरच नागरिकांनी हल्लाबोल केला. पोटाची भूक भागविण्यासाठी जेवणाच्या किट अक्षरशः लुटल्या. हा प्रकार पाहून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज (ता. ३०) यवतमाळ येथील आर्णी मार्गावरील किन्ही येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमाला नागरिकांची भरगच्च उपस्थिती राहावी, यासाठी जिल्ह्यातील सत्ता पक्षातील आमदार आणि लोकप्रतिनिधींना सांगण्यात आले होते. शिवाय प्रशासन या कार्यक्रमाच्या आयोजकाच्या भूमिकेत असल्याने त्यांनीही गर्दी जमविण्यासाठी परिश्रम घेतले. गावागावांत खासगी वाहने आणि एसटी बसेस पाठवून गर्दी गोळा करण्यात आली. त्यातूनच सकाळीच नागरिकांना घेऊन वाहने कार्यक्रमस्थळी दाखल झाली.

कार्यक्रम स्थळीच जेवणाची व्यवस्था असल्याचे लोकांना सांगण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश नागरिक न जेवता आले होते. प्रशासनाने जेवण बनविण्याचे कंत्राटही दिले होते. त्यामुळे सर्वांना वेळेत जेवण मिळेल, या आविर्भावात प्रशासन होते. मात्र झाले उलटेच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमस्थळी दुपारी १२.३० वाजता येणार होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत ते पोहोचले नव्हते.

मुख्यमंत्री शिंदे यांची वाट बघून आधीच नागरिक थकले होते. त्यात अनेकांना भुका लागल्या होत्या. तेवढ्यात जेवणाच्या किट घेऊन ट्रक कार्यक्रमस्थळी आला. ट्रक दिसताच नागरिकांनी त्यावर हल्लाबोल केला. ट्रकवर चढून नागरिकांनी अक्षरशः जेवणाच्या किट लुटल्या. प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने अनेकांना उपाशी राहावे लागल्याने लोकांनी रोष व्यक्त केला.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक नागरिकाला जेवण मिळाले पाहिजे. कुणीही उपाशी राहता कामा नये, असे आदेश दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला दिले होते. मात्र, नियोजन शून्यतेने १० मिनिटांत जेवण संपले. परिणामी जिल्ह्याच्या दूरवरून आलेल्या हजारो नागरिकांना उपाशी राहावे लागले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT