BJP Sarkarnama
विदर्भ

BJP News : भाजप नेत्याने 2 महिने रंगवला सत्तांतराचा थरार! पोलीस कारवाईच्या भीतीने फिरली ठाकरेंची शिवसेना; काँग्रेस 3 नगरसेवकही लागले गळाला

महागावात नितीन भुतडा यांच्या रणनीतीने भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आहे. रंजना आडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून, ३ बंडखोर नगरसेवकांच्या मदतीने भाजपने १२-५ असा दणदणीत विजय मिळवला.

Hrishikesh Nalagune

- गणेश भोयर

BJP News : मागील 2 महिन्यांपासून सुरु असलेला यवतमाळ जिल्ह्यातील महागाव नगरपंचायतीमधील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला. भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात महागाव नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी भाजपच्या रंजना आडे यांचा विजय झाला. शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे 3 बंडखोर नगरसेवकांच्या मदतीने 12 विरुद्ध 5 अशा मतांनी आडे यांनी विजय मिळवला.

2022 मध्ये झालेल्या नगरपंचाय निवडणुकीत काँग्रेसचे 7 आणि एक अपक्ष अशा 8 जागा निवडून आल्या. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 4, भाजप 4 आणि शिवसेना एक असे उमेदवार विजयी झाले होते. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्थानिक पातळीवर सुरुवातीपासूनच विस्तव जात नव्हता. काँग्रेसने आणि शिवसेनेने एकत्र बसू नये अशी काही नगरसेवकांची इच्छा होती. पण महाविकास आघाडीचा धर्म. पक्षादेश या गोष्टींचे सोपस्कार म्हणून हे पक्ष एकत्र आले.

अडीच वर्षे या दोन्ही पक्षात अंतर्गत वाद धुमसत होता. अशात काँग्रेसचे गटनेते शैलेश कोपरकर यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत काँग्रेसमधीलही 3 नगरसेवक नाराज होते. हे ओळखून 2 महिन्यांपूर्वीच भाजपकडून नगरपंचायतीमध्ये सत्तांतराचे प्रयत्न सुरु झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्याही भाजपसोबत गुप्त चर्चा चालू असल्याचे बोलले गेले. अशात भरवाडे यांचे अपहरण नाट्य रंगले. पण हे नाट्य बनावट असल्याचे पोलीस तपासातून समोर आले.

या प्रकरणात पोलीस भरवाडे यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता होती. पण यातूनच वाचवण्याचा शब्द देत भाजपने नगरपंचायतीमधील सत्तांतराचे डाव टाकले. प्रमोद भरवाडेंसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 नगरसेवकांना आपल्याबाजूने वळवले. शिवाय नाराज काँग्रेसमधील 3 नगरसेवकांना सोबत घेतले. अपहरण नाट्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत नगराध्यक्षा सुनंदा दिलीप सुरोशे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. 16 फेब्रुवारी रोजी 12 विरुद्ध 0 मतांनी हा ठराव मंजूरही झाला.

त्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला काँग्रेसच्या बंडखोर जयश्री नरवाडे यांच्या उमेदवारीच्या चर्चा होत्या. पण भाजपने ऐनवेळी रंजना आडे यांचे नाव पुढे केले. त्यांना अपेक्षित पाठिंबाही मिळाला. भाजपच्या रंजना आडे, गजानन साबळे, सुरेश नरवाडे, आशा बावणे, शिवसेनेचे प्रमोद भरवाडे, विशाल पांडे, रामराव नरवाडे, सुनीता डाखोरे, करुणा शिरबिरे आणि मो. परवेज शफी सुरैया, जयश्री इंगोले आणि जयश्री नरवाडे या काँग्रेसच्या 3 बंडखोर नगरसेवकांनी आडे यांना मतदान केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT