Yavatmal District Political News : बैलपोळ्याला झडत्यांचे मोठे आकर्षण असते. कास्तकारांचे संवेदनशील मन कधी उपरोधिक तर कधी गमतीशीर राजकीय, सामाजिक वाण जोपासणाऱ्या झडत्यांतून व्यक्त होते. अशीच एक झडती यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सादर करण्यात आली, जी आजच्या राजकीय परिस्थितीवर अगदी चपखल बसले. (Funny political, social variety is expressed through the cultivation of the search)
‘पोळा रे पोळा बैलपोळा, सारे झाले पोळ्यामंदी गोळा, युतीच्या सरकारात, शिंदे-देवेंद्रसोबत पळाले दादा, शेतकऱ्यांच्या मदतीचा, भुलला हो वादा...., एक नमन कवडा पार्वती, हर हर महादेव sss’
ओल्याचिंब श्रावणाला पिठोरी अमावस्येने निरोप दिला जातो. हा सण म्हणजे शेतकऱ्यांचा बैल पोळा. शेतकऱ्यांसोबत मातीत राबणाऱ्या प्रामाणिक बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण. शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैल शक्ती घटली असली तरी शेतकरी सुखदुःखांना विसरून ग्रामीण भागात आजही बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
‘आज घ्या आवतन, अन् उद्या या हो जेवायला’
असे बैलांच्या कानात गुणगुणत शेतकऱ्यांनी पोळ्याच्या पूर्वसंध्येला प्रथेनुसार खास निमंत्रण दिले आहे. त्याआधी सर्जा- राजाच्या आंघोळी, खांदे मळणी झाल्याने विश्रांती घेताना बैलही हरखले आहेत. जणू त्यांना आपला दिवस आल्याची चाहूल लागली.
यंदाचा पोळा वैशिष्ट्य़पूर्ण ठरला. श्रावण अधिक मास आला. मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेले. मान्सून उशिरा आला. नक्षत्रानुसार पाऊस न आल्याने पेरण्या लांबल्या. त्यात श्रावण महिन्यात तब्बल पंचवीस दिवस पाऊस सरी हरवल्या. इंद्रधनुष्य फुलला नाही. पिकांची वाढ खुंटली, उन्हात रोपट्यांनी माना टाकल्या. रोगराई वाढली. पिके हातची जाणार का, असा प्रश्न मनात बोचत असताना श्रावणाच्या अखेरच्या टप्प्यात पाऊस सरींनी फेर धरला. अखेर पिकांना जीवदान मिळाले आणि शेतकऱ्यांनी निःश्वास टाकला. म्हणूनच पोळा सणाला बळीराजा आनंदाने गोळा झाला.
गळ्यात घुंगुरमाळा, शिंगांना बाशिंग, अंगाखांद्यावर रंगीबेरंगी झूल, पायात वाळे असा साज चढविलेले बैल गावातील मंदिराच्या पारावर आंब्याच्या तोरणाखाली दाटीवाटीने उभे राहतात. हा पोळ्याचा देखणा क्षण शेतकऱ्यांसाठी मोठा आश्वासक वाटतो. आपल्या सर्जा-राजा बद्दल त्याला अभिमान वाटतो. बैलांच्या पूजनाचा मान गावातील पाटील यांना मिळतो. यावेळी शंकराची आरती, काही ठिकाणी मंगलाष्टके म्हटल्या जातात.
अशावेळी झडत्यांनाही मोठा जोर चढतो. पूर्वी एकमेकांची गंमत-जंमत करण्यासाठी झडत्यांचा वापर होत असे. अलीकडे शेतकऱ्यांच्या वेदना, व्यथा व्यक्त करताना ग्राम्य शैलीत शब्दांची गुंफण केली जाते. काही दिवसांपूर्वी कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला. बोंड अळी म्हणजे जणू शेतकऱ्यांचा बळी, असे समीकरण झाले आहे. हीच व्यथा झडतीतून विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.
‘पोळा रे पोळा, कास्तकाराचा पोळा, या पोळ्यामंदी, झाले अवघे गोळा, कापसाले मारला हो, बोंडअळीने डोळा, एक नमन कवडा पार्वती हर हर महादेव sss’
अलीकडे राजकीय (Political) पातळीवर फोडाफोडी अन् ईडीचे (ED) राजकारण रंगत आले आहे. त्यामुळेसमाजकारणही ढवळून निघाले आहे. त्यावर पुसद (Pusad) तालुक्यातील मांडवा येथील शेतकऱ्याने तयार केलेली झडती गुरुवारी पोळ्याला खास शैलीत सादर होणार आहे.
‘पोळा रे पोळा बैलांचा पोळा, शेतकऱ्यांच्या पिकावर, व्यापाऱ्यांचा डोळा, व्यापारांच्या पैशावर मंत्र्यांचा डोळा, मंत्र्याच्या पैशावर ईडीचा डोळा..., एक नमन कवडा पार्वती, हर हर महादेव sss’
बैलपोळ्याच्या या झडत्यांमध्ये वाईट चालीरीती, व्यसनांवरही टीका टिपणी झाल्याशिवाय राहत नाही. विशेषतः बुजुर्ग व्यसनधारी युवकांना टोमणे मारतात. ‘काटे हो काटे बोरीचे काटे, नवरा बायकोचा झगडा मचला, खर्रा खाण्यासाठी, एक नमन कवडा पार्वती, हर हर महादेव sss’
खरे तर, कष्टकरी बैलांच्या पोळ्याच्या या सणाला कर्जाच्या ओझ्याकडे दबलेला शेतकरी पुरणपोळी खाऊ घालून बैलांचे ऋण फेडतो. मात्र त्याच्यावरचे ऋण अर्थात कर्ज काही केल्या फिटत नाही. एकीकडे निसर्ग साथ देत नाही. तर दुसरीकडे सुल्तानशाही कड पलटू देत नाही. अशा अवस्थेतही तो जिणे हरत नाही. हे खरे असले तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरील झडती ऐकून सरकारचे डोके ठिकाणावर येईल का, असा शेतकऱ्यांचा खणखणीत सवाल आहे.
‘पिकपाण्याची नुस्तीच धुयधानी, भरून निघत नाही कशी हानी, शेतकरी राजा घेतो रे फाशी, उघड्यावर संसार, लेकरं बाळं उपाशी, आला आला रे पोळा, उघडेल का आतातरी, सरकारचा डोळा...'
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.