Farmer Issue  Sarkarnama
विदर्भ

Yavatmal : तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याने घेतले विष; न्याय मिळत नसल्याने...

Farmer Issue: सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची करवाई झाल्याने संतापाची लाट

सतीश हरिश्चंद्र येटरे

Tehesil Office Case : नाला वळविण्यात आल्याने पिकांचे नुकसान झाले. वारंवार मागणी करून न्याय मिळत नसल्याने एका शेतकर्‍याने थेट तहसीलदारांच्या दालनात जात विषाचा घोट घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार पुढे येताच पायाखालची वाळू सरकलेल्या प्रशासनाने शेतकऱ्याला उपचारासाठी नेले. त्यानंतर त्याच्याविरुद्धच आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा तहसीलदारांनी नोंदविला आहे. त्यामुळे शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या या हेकेखोरीबद्दल रोष व्यक्त केला आहे.

गौतम गेडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकर्‍याचे नाव आहे. ते आर्णी तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहेत. त्याची आर्णी तालुक्यातील जवळा शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. शेतीलगत असलेला नाला वळविण्यात आल्याने त्याच्या शेतात नाल्याचे पाणी शिरले. त्यामुळे शेतीतील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेती खरडून गेल्याने नुकसानात भरच पडली.

हवालदिल झालेले शेतकरी गेडे यांनी यासंदर्भात आर्णीचे तहसीलदार परशराम भोसले यांच्याकडे तक्रारी केल्या. न्याय मिळावा, यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. मात्र उपयोग झाला नाही. सरकारकडून प्रत्येक वेळी उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने खचून जात शेतकरी गेडे यांनी टोकाचा निर्णय घेतला. थेट आर्णी तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार परशराम भोसले यांच्या दालनात जात विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच तहसीलदार भोसले यांनी पोलिसांना पाचारण केले. शेतकरी गेडे यांना त्यांच्या ताब्यात देत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर शेतकरी गेडे यांची समजूत घालून न्याय देणे अपेक्षित असताना तहसीलदार भोसले यांनी त्यांच्यावर कारवाई केली.

आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करणे अपेक्षित असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शेतकरीवर्गातून रोष व्यक्त होत आहे. आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी यावर संताप व्यक्त केला. अधिकार्‍यांनो, शेतकर्‍यांशी सन्मानाने वागा, असा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकार्‍यांनी शेतकर्‍याची बाजू घेतली असती तर ही वेळ आली नसती. आता अधिकार्‍यांना पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आर्णीच्या तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी गौतम गेडे यांची बहीण श्‍वेता डेरे यांनी केली आहे. तहसीलदारांची बदली करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी दिला आहे. प्रशासकीय कामकाजाचा फटका जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बसत आहे. राज्य सरकारचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केला आहे. विषप्रकरणावरून जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तहसीलदार वादग्रस्तच!

तहसीलदार परशराम भोसले हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात राहतात. आर्णी तालुक्यातील एका रेती घाटावर दारव्हा येथील तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी धाड घालून ट्रेझर बोट, जेसीबी, ट्रक असे कोट्यवधीचे साहित्य जप्त केले होते. तपासात पोलिसांसह महसूल प्रशासनाचे या रेतीतस्करीला पाठबळ असल्याचे पुढे आले होते. त्यावेळी तहसीलदार भोसले चांगलेच अडचणीत सापडले होते.

पोलिसांकडूनही अपमान

विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ढकलत आपल्या वाहनात कोंबले. या प्रकाराचा व्हिडीओ काढण्यात आला आहे. ना ही महसूल प्रशासन तर विष प्राशन केले आहे, हे लक्षात घेता किमान माणुसकी म्हणून तरी पोलिसांनी असे वागायला नको होते, असा संतापही व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT