Parbhani news : सेल्फ गोल म्हणजे फुटबॉल किंवा हॉकी खेळामध्ये संघातील खेळाडूकडून अनाहूतपणे झालेल्या गोलमुळे प्रतिस्पर्ध्याच्या गोलची संख्या वाढणे. अगदी असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत झाला आहे.
जितेंद्र आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त भूमिका आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सेव्ह गाझा आंदोलन,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात राज्याच्या विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात वादग्रस्त भाषणामुळे जितेंद्र आव्हाड यांची हिंदूधर्म व परंपरा विरोधी प्रतिमा तयार झाली. त्यांच्या मतदारसंघासाठी हे सोयीचे असले तरी राज्याच्या सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांच्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त होऊ लागले. आव्हाडांनी ही प्रतिमा कायम जपली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडूनही त्यांना याबाबत कधी अटकाव झाला नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील बंडाळीनंतर आव्हाड यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचे ठरवले. शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात आव्हाड यांनी केलेल्या विधानाने राज्यात गदारोळ उडाला आहे. राम हे शाकाहारी नसून मांसाहारी होते असे विधान त्यांनी केले. स्थळ, काळ व वेळ चुकल्याने आव्हाड एकाकी पडले आणि त्यांना विधान मागे घ्यावे लागले.
अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होते, त्यामुळे त्या जागी राम मंदिर उभारण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आणि २२ जानेवारी २०२४ रोजी बांधकाम पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद यांनी देशभर विविध कार्यक्रमांचे मोठे आयोजन केले आहे.
धार्मिक क्षेत्रात राममय वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने देश, विदेशातील विविध क्षेत्रातील अतिमहत्वाच्या व्यक्ती,देशातील संत महंत यांना निमंत्रण देण्यात आले असून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अशा स्थितीत श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काहीच हाती लागणार नव्हते.
अयोध्येतील राम मंदिर हा भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातील अतिशय महत्वाचा मुद्दा. त्यामुळे भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा राजकीय लाभ करून घेणार हे तर उघडच आहे. अशा स्थितीत जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने भाजपच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हे नेहमीच हिंदुत्वविरोधी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतो. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने भारतीय जनता पक्षाच्या राजकीय आरोपांना पुष्टी मिळाली आहे. त्याचा राजकीय फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आव्हाड यांच्या विधानाने राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षातही त्यांच्या समर्थनात कोणीही पुढे आले नाही. याउलट रोहित पवार यांनी अशा विषयावर बोलण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर बोलण्याचे आवाहन केले. त्याला उत्तर देताना आव्हाडांनी रोहित पवार यांच्या बोलण्याला फारसे महत्व देत नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटकपक्षानी सुध्दा या विषयावर हात झटकले आहेत.
एकूणच साईबाबांच्या शिर्डीत जनतेच्या श्रद्धेला ठेस पोहोचवून सबुरी न ठेवणाऱ्या आव्हाडांनी सेल्फ गोल केला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या गोलसंख्येत वाढच झाली आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.