Headmistress Controversy Sarkarnama
विदर्भ

Yavatmal: धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका मॅडम गाढ झोपेत : शिक्षक नसलेल्या मद्यधुंद पतीचा खुर्चीवर बसून 'क्लास'

Yavatmal ZP School, Headmistress Controversy, Khandala School: यवतमाळच्या खंडाळा जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका शाळेत झोपल्याचा आरोप झाला आहे. संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकत कारवाई व बदलीची मागणी केली असून चौकशी सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal ZP School: यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा सुरू असताना मुख्याध्यापिका अस्ताव्यस्त अवस्थेत झोपलेल्या आढळल्याचा आरोप करत शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकून संबंधित शिक्षिकेची तातडीने बदली करण्याची मागणी केली.

तक्रारीनुसार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर वासुदेव ढोके यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर त्याने "मॅडम शाळेत झोपल्या आहेत," अशी माहिती दिली. ढोके शाळेत जाऊन पाहिले असता संबंधित मुख्याध्यापिका खरंच झोपलेल्या अवस्थेत आढळल्या. याचवेळी त्यांच्या पतीने, शिक्षक नसतानाही, मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसून मद्यधुंद अवस्थेत पालकांशी अरेरावी आणि दमदाटी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षिका रुजू झाल्यापासून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थीसंख्या दोन्हीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश नेर येथील इतर शाळांमध्ये घेतले आहेत. संबंधित शिक्षिका नियमितपणे वेळेत शाळेत उपस्थित राहत नसल्याचा आणि याबाबत जाब विचारणाऱ्यांना धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीशी संबंधित एसआयआरची जबाबदारीही त्यांनी पार पाडली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वटफळी केंद्राचे केंद्रप्रमुख घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. मात्र, तोपर्यंत संबंधित शिक्षिका पतीसह तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांनी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे. संबंधित प्रकरणाची प्राथमिक दखल घेण्यात आली असून, सोमवारी शिक्षिकेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याआधी त्यांची तात्पुरती बदली करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT