Maharashtra News Live Update : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 25 June 2026 : नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल जाहीर केला जाणार आहे. यासह राज्यभरातील विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Live  Update
Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आव्हानाचा सामना करावा लागला आहे. विमानतळाच्या अधिकृत संकेतस्थळावर एका अज्ञात व्यक्तीने ई-मेल आणि मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून बॉम्ब असल्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या धमकीनंतर विमानतळ परिसरात तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक शांततेलाही धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत केली टीका

मुंबईच्या लोकलमध्ये एका मराठी तरुणाची निर्घृण हत्या होते... महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत... खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे...पुण्यात विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी जातो... एका जिवंत महिलेला मृत घोषित करून तिच्या वडील आणि भावाला अटक करून मारहाण केली जाते... सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते... असे ट्वीट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.

भाजपच्या अध्यक्षावर शंभर दिवसात 'शून्य काम' झाल्याचा ठपका!

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद पाहायला मिळत आहे. तर विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेने आता थेट भाजपाच्या अध्यक्षावर तोफ डागायला सुरूवात केली आहे. झेडपीतील शिवसेनेचे गटनेते राधाकिशन पठाडे यांनी अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या शंभर दिवसाच्या कामकाजाचा पंचनामा करताना शून्य काम झाल्याची टीका केली आहे.

तुकाराम मुंढेच्या विभागाची भिवंडीत कारवाई; ॲमेझॉनच्या गोदामावर छापा   

अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडीतील सरलगाव परिसरातील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामावर मोठी कारवाई केली आहे. कालबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. तर व्यवस्थापकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी अखेर सहा जणांवर गुन्हा दाखल

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहा जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याशिवाय काही कर्मचाऱ्यांच्या मार्फत चोरी केली गेली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

‘ऑपरेशन टायगर’मध्ये भाजप कुठेही नाही : चंद्रशेखर बावनकुळे

‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, असं तुम्हाला कोणी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसं सांगितलं आहे का? त्यांच्या पार्टीत काय करायचं, हे एकनाथ शिंदे ठरवतील. पार्टी चालवायची की बरबाद करायची, हे उद्धव ठाकरे ठरवतील. शिंदे आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये भाजप कुठं आली. ऑपरेशन टायगरमध्ये भाजप कुठेही नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

संजय दिना पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा निषेध

पत्रकारांना धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर राज्यातील पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. खासदार पाटील यांनी पत्रकार दिलेल्या धमकीबाबत खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, त्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे.

भंडाऱ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का

भंडारा जिल्ह्यातील मोहडी पंचायत समितीचे सभापती जगदीश शेंडे आणि उपसभापती रेवानंद ऊर्फ देवा चकुले यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. या दोघांविरोधातही १० विरुद्ध ०२ असा ठराव मंजूर झाला आहे. हे दोघेही राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीप्रकरण महासचिव चंपत रॉय राजीनामा देण्याची शक्यता

अयोध्येतील कथित राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी झालेल्या आरोपामुळे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत रॉय हे राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राम मंदिराच्या देणगीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे रॉय हे राजीनामा देण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री फडणवीसही खासदार संजय दिना पाटलांवर नाराज,एकनाथ शिंदेंसोबत बैठक सुरू 

बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या अर्वाच्च भाषेतील शिवीगाळ आणि मारून टाकण्याच्या धमकीनंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. यावरुन पाटलांवर चौफेर टीका होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही याबाबत तीव्र नाराजी दर्शवली आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये संजय दिना पाटलांच्या वादग्रस्त विधानावर बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

'जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला, त्याचा आज अस्त होताना...'; नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचलं 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनंतर आता पुढचा नंबर आमदारांचा लागेल. खासदारांना जो काही मोबदला मिळाला, आता आमदार म्हणणार आम्हाला मिळू दे राजकीय वर्चस्व असं वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. बाळासाहेबांची आठवण मला येते, उद्धवची नाही. जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला, त्याचा आज अस्त होताना मला बरं वाटत नाही, वाईट वाटतं असंही राणे यांनी म्हटलं.

'घाबरलेले संजय दिना पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे...'; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल 

सुषमा अंधारे यांनीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्या अरेरावी आणि धमकीवर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "घाबरलेले संजय दिना पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे करत असतील तर याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा? सध्या अधिवेशन सुरू आहे. भास्कर जाधवांनी सभागृहात प्रश्न विचारला, यावर उत्तर येईपर्यंत सभागृहात पुढचं कामकाज झालं नाही पाहिजे," असा इशाराही अंधारे यांनी बोलून दाखवला.

एका संजयची चूक, दुसऱ्या संजयने मागितली माफी 

 संजय दीना पाटील यांनी जी भाषा वापरली, त्यांच्याकडून जी चूक झाली त्या बद्दल संजय शिरसाट यांनी माफी मागितली आहे. संजय शिरसाट हे शिवसेनेचे मंत्री आणि प्रवक्ते आहेत. संजय पाटील यांच्या बोलण्याच कोणी समर्थन करणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

रविकिरण इंगवले यांनी दिला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रविकिरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. कोणतेही कारण आता अथवा राजकीय विश्लेषण न देता राजीनामा देत असल्याचा पत्रात उल्लेख. रविकिरण इंगवले यांनी यापूर्वी दोन वेळा शहर प्रमुख आणि सध्या जिल्हाप्रमुख पदाचा स्वीकारला होता कारभार. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल कॉल रेकॉर्डिंग मुळे जिल्हाप्रमुख आले होते चर्चेत.

हिम्मत आणि लाज असेल तर राजीनामा द्या : आदित्य ठाकरे

संजय दिना पाटील हे लोकप्रतिनीधी राहिलेले नाहीत. ते मिंधे प्रतिनिधी झाले आहेत. ते शिव्या व धमक्या देत आहेत. दादागिरीचा आव आणत आहेत. त्यांच्यात थोडीजरी हिम्मत आणि लाज असेल तर त्यांनी आज खासदारकीचा राजिनामा द्यावा. निवडणूक भाजपा आणि मिंधेंच्या चेहऱ्यावर लढवून दाखवावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

Sunil Raut ON Sanjay Patil : संजय पाटील भरकटलेत, सुनिल राऊत यांचा घणाघात

शिवसेना (UBT) नेते सुनील राऊत यांनी संजय पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया देत “संजय पाटील भरकटलेत” असा घणाघात केला आहे. संजय पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना आता सुनील राऊत यांच्या या प्रतिक्रियेमुळे आरोप-प्रत्यारोपांना आणखी वेग आला आहे.

संजय दिना पाटील पत्रकारांवर घसरले

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना आता पत्रकारांचे प्रश्नही बोचू लागलेत. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. अशा शब्दांत त्यांनी अरेरावी केली. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला काय करायचंय ते करा, अशी अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरलीय.

Sanjay Dina Patil news : संजय दिना पाटील यांच्याकडून पत्रकारांना धमकी

एकनाथ शिंदे शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून पत्रकारांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच मारण्याची धमकीही दिली आहे. इज्जत देतोय, इज्जतीत राहा, असेही ते म्हणाले आहेत.

Nasrapur Case update : आरोपीने रेकी करून थंड डोक्याने हा गुन्हा केला

नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने आरोपीला दोषी ठरविल्यानंतर सरकारी वकिलांनी याबाबत अधिकची माहिती दिली. आरोपीने रेकी करून थंड डोक्याने हा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होणे अपेक्षित असल्याचे वकिलांनी सांगितले.

NCERT news : इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात आणीबाणीवर धडा

इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात आणीबाणीचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा इतिहास यापुढे नववीतील विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. एनसीईआरटीकडून हा बदल करण्यात आला आहे

Nasrapur Case update : भीमराव कांबळे याला कोर्ट २९ जूनला शिक्षा ठोठावणार

नसरापूर चिमकुली अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाकडून २९ जूनला शिक्षा ठोठावली जाणार आहे. कोर्टाने आरोपीला चार कलमांतर्गत दोषी धरले आहे.

नसरापूर प्रकरणात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचं लक्ष

नसरापूर येथील अत्याचार आणि हत्येच्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी कांबळेला दोषी घोषित केले आहे. तपासादरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा विचार करून हा निर्णय देण्यात आला. आता आरोपीला किती आणि कोणती शिक्षा ठोठावली जाणार, याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची मागणी; सरकारी पक्षाची न्यायालयात ठाम भूमिका

नसरापूर येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात सरकारी पक्षाने न्यायालयात कठोर भूमिका मांडली. आरोपीने आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केलेला नसल्याचे सांगत, तो दयेचा पात्र नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे त्याला सर्वोच्च शिक्षा म्हणून मृत्युदंड सुनावावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली.

नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण; अवघ्या दीड महिन्यात निकाल, भीमराव कांबळे दोषी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आले. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल जाहीर केला असून शिक्षेबाबतचा युक्तीवाद सध्या सुरू आहे.

Sharad Pawar : आमदार फुटीच्या चर्चांना शरद पवारांचा पूर्णविराम; पक्ष एकसंघ असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील आमदार फुटणार असल्याच्या चर्चांना शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. पक्षातील सर्व आमदार ठामपणे सोबत असून कोणताही आमदार दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार फुटीबाबत सुरू असलेल्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे सांगत पक्ष एकसंघ आणि मजबूत असल्याचा दावा पवार यांनी केला.

'लेक लाडकी' योजना पुण्यात ठरतेय अपयशी?

राज्य सरकारने मुलींच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'लेक लाडकी' योजनेकडे यंदा पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक चित्र आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात लाभार्थ्यांच्या संख्येत थेट दुप्पट घट झाली असून, यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या योजनेच्या सलग तीन वर्षांच्या अंमलबजावणीचा लेखाजोखा पाहिला तर प्रशासकीय उदासीनता स्पष्टपणे अधोरेखित होते.

वीस लाखाचे भेसळयुक्त तेल; भेसळीच्या रॅकेटला सरकारचाच आशीर्वाद

दोन वर्षांपूर्वी वीस लाख रुपयांचे भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले. त्याबाबत भेसळीचा नमुना बेंगलोर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आला. मात्र गेल्या दोन वर्षात त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळे हे भेसळयुक्त तेल व्यापाऱ्याला परत करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आमदार आमशा पाडवी यांनी केला. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. यावर सरकारने कारवाईच्या आश्वासन दिले. त्याचा पाठपुरावा देखील झाला. मात्र प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. बंगरूळू येथील प्रयोग शाळेतून अहवाल येण्यास किती दिवस लागतात? दोन वर्षात देखील अहवाल येत नसेल तर सरकार काय करीत आहे?

30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार; दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये भूकंप, हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती

व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये अवघ्या काही सेकंदांच्या अंतराने दोन मोठे भूकंप झाले. पहिल्या भूकंपाची तीव्रता ७.२ होती, तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी नोंदवली गेली. अनेक इमारती कोसळल्या असून लोक घाबरून घराबाहेर रस्त्यावर आले आहेत. गृहमंत्री डायओसदादो कॅबेल्लो यांनी लोकांना आपली घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे. 'यूएस जिओलॉजिकल सर्व्हे'च्या (USGS) अंदाजानुसार, मृतांचा आकडा १०,००० च्या वर जाण्याची शक्यता आहे.

नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर होणार

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याचा निकाल आज गुरुवारी लागणार आहे. राज्यातील जलदगतीने सुनावणी झालेला हा पहिलाच खटला ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com