Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Bawankule : आश्चर्यचकित व्हाल, असे प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होणार आहेत !

उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये जी बेइमानी राज्याच्या जनतेसोबत केली, त्याचा बदला जनता २०२४च्या निवडणुकीत घेणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सर्व धर्मांना, समाजाला सोबत घेऊन विदर्भाचा, राज्याचा विकास साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल करून ठेवला होता. पण फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत येताच त्यांनी चुटकीसरशी तो प्रश्‍न सोडविला. त्यामुळेच जनता भाजपकडे आशेने बघत आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये जी बेइमानी राज्याच्या जनतेसोबत केली, त्याचा बदला जनता २०२४च्या निवडणुकीत घेणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे अमरावती (Amravati) जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी आज भाजपच्या येथील धंतोलीच्या कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे स्वागत केल्यानंतर आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पत्रकारांशी बोलत होते. राजेश वानखडे यांनी त्यांच्या ३५ - ४० समर्थकांसह भाजपमध्ये (BJP) प्रवेश घेतला. पुढील काळात अमरावतीमध्ये मेळावा घेऊन त्यांचे ५०००पेक्षा अधिक कार्यकर्ते भाजपमध्ये येणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.

आश्चर्यचकित व्हाल, असे प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होणार आहेत. अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्याकडे आपला इशारा आहे का, असे विचारले असता बावनकुळे म्हणाले, मी कुणाकडेही इशारा करीत नाहीये. या देशाला कळून चुकले आहे की, २१व्या शतकात मजबूत भारत निर्माण करायचा असेल तर, जगात सर्वश्रेष्ठ देश म्हणून भारताची ओळख निर्माण करायची असेल तर पंतप्रधान मोदींशिवाय ते कुणीही करू शकत नाही. असे सामान्य जनतेला वाटत आहे आणि विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांना ही जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे असे सर्व नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

त्यांच्याकडे लढायलाही माणसं उरणार नाहीत..

ओरिजनल शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांचा झंझावात महाराष्ट्रात सुरू झाला आहे. यापुढे विविध राजकीय पक्षांतील लोक भाजपमध्ये येणार आहेत. २०२४ पर्यंत वेळ अशी येईल की, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या गटाकडे निवडणुकीत लढायलाही माणसं उरणार नाहीत, असा दावा आमदार बावनकुळे यांनी केला. परवा बारामती, काल पुणे आणि आज मुंबईला मी जाऊन आलो. उद्धव ठाकरेंच्या सेनेचे अनेक नेते, कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत आणि आगामी काळात त्यांचेही प्रवेश भाजपमध्ये होणार आहेत, असेही ते म्हणाले.

जनतेच्या मनातील सरकार..

महाराष्ट्राच्या जनतेने २०१९ साली जो कौल दिला होता, ते सरकार आता राज्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेला प्रत्येक जिल्ह्यात खिंडार पडणे सुरू झाले आहे. त्याचे काही लोक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि काही लोक भाजपमध्ये येत आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचा तळागाळातील कार्यकर्ता रहायला तयार नाही. २०२४च्या निकालानंतर २०१९ मध्ये केलेली चूक उद्धव ठाकरेंना कळेल. कारण त्या बेइमानीचा बदला जनता २०२४ मध्ये नक्कीच घेईल, असे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT