Nitin Deshmukh Meeting at Akola Sarkarnama
विदर्भ

Shiv Sena : आमदाराचे भाषण सुरू तरुण गर्दीतून उभा राहिला अन‌्..

जयेश विनायकराव गावंडे

Shiv Sena : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे भाषण सुरू असतानाच एका तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. देशमुख समर्थकांनी या तरुणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार देशमुख यांनी त्याला स्टेजवर बोलावून घेत आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. कापसाच्या भाववाढीवरून संतप्त झालेल्या या तरुणाने आमदार नितीन देशमुख यांच्या भाषणात व्यत्यय आणत काही मुद्देही उपस्थित केले. अकोला शहरातील जुने शह भागात असलेल्या राजेश्वर मंदिराजवळ हा प्रकार घडला.

केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सोयाबीन, कापसाच्या हमीभावावर ठोस निर्णय घेऊन कापूस, सोयाबीनची भाववाढ करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावतीने 15 फेब्रुवारीपासून जिल्हाभरात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात 500 किलोमीटरची यात्रा करीत आमदार देशमुख यांनी जिल्ह्यातील 300 गावांना भेट दिली. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. देशमुख यांच्या यात्रेचा समारोप शनिवारी (ता. दोन) करण्यात आला. जुने शहरात यावेळी आमदार नितीन देशमुख यांचे एका सभेत समारोपीय भाषण झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार नितीन देशमुख हे भाषण करीत असतानाच एका तरुणाने भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार नितीन देशमुख यांचे समर्थक या युवकाला सभेतून ओढत बाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही हा तरुण ऐकत नव्हता. अखेर या तरुणाला आमदार देशमुख यांनी थेट स्टेजवर बोलावले. माइकवर बोलायला सांगितले. या तरुण शेतकऱ्यांने कापसाच्या भाव वाढीवर प्रश्न उपस्थित केले. आपल्याला सुरुवातीला सहा हजाराने कापूस विकावा लागला. आता कापूस 8 हजार 300 रुपये दरावर कसा पोहोचला, असा प्रश्न या तरुणाने भर सभेत विचारला. तरुण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेकडून संघर्ष यात्रा काढण्यात आली आणि त्यात निवडणूक तोंडावर आल्याचे पाहत कापसाचे भाव वाढविण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.

परवानगीवरून तणातणी

आमदार नितीन देशमुख यांच्या सभेसाठी निवडण्यात आलेल्या अकोला शहरातील जागेवरून आता शिवसेनेविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे. जय हिंद चौकाकडून किल्ला चौकाकडे जाणाऱ्या एकमेव मार्गावर पूर्ण रस्ता बंद करीत ही सभा घेण्यात आली. अग्नीशमन दलाचा बंब किंवा रुग्णवाहिका जाण्यापुरती जागा सोडत व्यासपीठ उभाराचे असा सल्ला जुने शहर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिला होता. परंतु सभेतील उपस्थितांची संख्या पाहता ते शक्य नसल्याचे शिवसेनेकडून पोलिसांना सांगण्यात आले.

सभेच्या अखेरच्या क्षणापर्यंत पोलिसांनी परवानगी अडवून ठेवली होती. अशात शिवसेनेकडून पूर्ण रस्ता बंद करीत सभा घेण्यात आली. त्यामुळे जय हिंद चौकाकडून किल्ला चौकाकडे जाणाऱ्या नागरिकांना बराच लांबचा फेरा घ्यावा लागला. विशेष म्हणजे सभेच्या दोन्ही बाजूला असलेल्या चौकांमध्ये पोलिसांनी लोखंडी कठडेही उभारले नव्हते. त्यामुळे व्यासपीठापर्यंत पोहोचेपर्यंत लोकांना रस्ता बंद आहे, हे कळत नव्हते. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT