Nagpur ZP News : सामान्य लोकांच्या घरी चोरी झाली की, त्याची पोलिसांत तक्रार केली जाते आणि चौकशी होते. पण जिल्हा परिषद सभापतींच्या निवासस्थानांमधील साहित्य गायब झाले आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. पण अध्यक्षांनी अशी चौकशी करण्यास नकार दिला आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची निवासस्थाने आहेत. या निवासस्थानातून महागडे फर्निचर, एलईडी, बेडशिटसह अन्य साहित्य गायब झाले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. अध्यक्षांनी मात्र ही मागणी धुडकावून लावली. या सभापती निवासस्थानांतून महागडे फर्निचर, सोफा, खुर्च्या तसे इतर दर्जेदार साहित्य, एलईडी व बेडशिट गायब झाल्या आहेत. जनतेच्या पैशातून लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानात सोयीसुविधा पुरविण्यात येतात. अशा पद्धतीने साहित्य गायब होणे, ही बाब गंभीर आहे.
या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते (Opposition Leader) आतिश उमरे व शिवसेना (Shivsena) शिंदे (Eknath Shinde) गटाचे सदस्य संजय झाडे यांनी केली. पाच वर्षांपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची चौकशी करता येत नाही. त्याचा हिशेब मागू शकत नाही, असे उत्तर देत अध्यक्षांनी (President) त्यांची मागणी उडवून लावली. विरोधक चौकशीच्या मागणीवर ठाम होते. जबाबदार लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानातून साहित्य चोरीला जाणे हा प्रकार सत्तापक्षाचा कारभार कुठल्या पद्धतीने सुरू आहे, याचा परिचय देतो आहे.
दरम्यान, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी स्वत: आपला बंगला नवीन अध्यक्षांकडे हस्तांतरित करताना आपण एकूण एक साहित्याचा हिशेब दिल्याचे बैठकीत सांगितले. असे असताना सभापतींनी प्रोटोकॉल का पाळला नाही. याविषयीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे आहे. त्यांचेही हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
जनतेच्या पैशाच्या एका टाचणीचाही हिशेब आपण सत्तापक्षाकडून घेऊ. सत्तापक्षाने चौकशी समिती नेमून दोषींवर गुन्हे दाखल करावे व अहवाल सर्वसाधारण सभेत ठेवावा. येत्या सर्वसाधारण बैठकीत हा मुद्दा उचलून धरू.
आतिष उमरे, विरोधी पक्षनेते.