ZP Nagpur News
ZP Nagpur News Sarkarnama
विदर्भ

ZP Nagpur News : सरपंच भवन असतानाही इतरत्र घेतले सरस प्रदर्शन, अधिकाऱ्यांवर शंका !

Atul Mehere, सरकारनामा ब्यूरो

जिल्हा परिषदेचा महसूल वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी सरपंच भवन विकसित करण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी सरपंच भवनाचे ब्रांडिंग केल्यास त्याचा फायदा होईल, असे असताना प्रशासनाकडून दुसऱ्या स्थळांना पसंती देण्यात येत आहे. (How will the income of the district council increase)

अधिकारी जर असा कारभार करत राहिले, तर जिल्‍हा परिषदेचे उत्पन्न वाढणार कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सरपंच भवन असताना दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून खर्च करण्यात येत असल्याने अधिकाऱ्यांच्या कारभारावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तीन दिवसीय सरस प्रदर्शनीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या प्रदर्शनात महिला बचत गटाद्वारे उत्पादित करण्यात आलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. पण या प्रदर्शनात यात खाद्य पदार्थच जास्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे फक्त जेवणासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले का, असा सवालही काहींकडून उपस्थित करण्यात येत आहे. या प्रदर्शनाची माहिती अनेक सदस्यांना देण्यात आली नाही.

प्रदर्शनावर ११ लाखांचा खर्च करण्यात आला असून १० लाखांची फाईल तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेचे स्वतःचे सरपंच भवन आहे. उत्पन्नाच्या दृष्टीने ही जागा विकसित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कृषी विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजनही यापूर्वी करण्यात आले आहे. सरस प्रदर्शनीचे आयोजन येथे झाले असते तर उत्पन्न मिळाले असते. शिवाय याचे ब्रांडिंग सुद्धा करता आले असते, असे मत खासगीत व्यक्त करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला प्राधान्य दिले. यामुळे जिल्हा परिषदेचे (ZP) आर्थिक नुकसान झाल्याची चर्चा होत आहे. या प्रदर्शनाबाबत गुप्तता पाळून व दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्रमाचे आयोजन करून कुणाचे हित साधण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून करण्यात आला, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे काही सदस्य या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT