Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : 'कुठे नेऊन ठेवलंय माझ्या महाराष्ट्राला, गहाण ठेवलाय गुजरातला' ; विजय वडेट्टीवारांचे महायुतीवर टीकास्त्र!

Mayur Ratnaparkhe

Vijay wadettiwar on Vidhan Sabha Election : विधानसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत बोलताना, सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. याचबरोबर उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत, त्यावरून शिवसेना शिंदे गट टीका करत आहे, त्यावरही वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विजय वडेट्टीवार(Vijay wadettiwar) म्हणाले, 'विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात काल दुसरी बैठक झाली. आम्ही काल धोरणावर चर्चा केली, काही प्रमाणात फॉर्म्युलांवर चर्चा झाली. विशेष करून पहिली महत्त्वाची महाविकास आघाडीची सभा होणार आहे. संपूर्ण राज्यातून तिन्ही पक्षाचे नेते पदाधिकारी यावेत, अशी योजना आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये 16 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. याद्वारे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच एकप्रकारे फोडला जाणार आहे. याशिवाय 20 ऑगस्ट रोजी राहुल गांधी मुंबईत येत आहेत, त्याबाबतही चर्चा झाली.'

याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, 'कोणी दिल्लीत जायचं नाही जायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते इंडिया आघाडीतील एक घटक पक्षाचे नेते आहेत. इंडिया आघाडी ताकदीने लोकसभा निवडणूक लढली. काही जागा भाजपने फंदफितुरीने जिंकल्या नाहीतर देशातील चित्र वेगळं असलं असतं. मोदींना लोकांनी पसंती दिलीच नव्हती. अशा स्थितीत आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांना भेटणं हे काही गैर नाही. यावर जर कुणी टीक करत असतील, तर त्या ते लखलाभ आहे.'

याशिवाय, 'तुम्ही(भाजप) केलेलं सगळं चालतं, परंतु दुसऱ्यांनी कोणी काही केलं तर त्यावर तुम्ही टीका करणार? त्यामुळे या टीकेला फार काही अर्थ नाही. इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून दिल्लीत जाऊन चर्चा करणे, भेटणं पुढील निवडणुकीसाठी रणनिती ठरवणं हा त्याचा भाग असू शकतो.' असंही वडेट्टीवारांनी सांगितलं.

याचबरोबर 'दिल्लीत तसे ठाकरे घराणे फार काही जात नाही, हा पूर्वीपासूनचा इतिहास आहे. आता जर ते कुटुंबाला घेऊन गेले आहेत, तर दिल्ली बघायलाही गेले असतील. त्यामुळे त्याला मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंगचा वैगेरे अर्थाने जोडणे योग्य नाही. आम्ही तिन्ही पक्ष केवळ या महाभ्रष्टाचारी खोके सरकारला सत्तेतून हाकलण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार केला आहे. देशाच्या संविधानाच्या सुरक्षेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आता एकत्र यायचं आहे.

कारण, महाराष्ट्र हा गुजरातला गहाण ठेवलाय. कुठे नेऊन ठेवलय माझ्या महाराष्ट्राला, गहाण ठेवलाय गुजरातला. असं म्हणायची सध्या वेळ आली आहे.' अशी टीका वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT