Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : 'असे मोर्चे गुजरातमध्ये का निघत नाहीत, महाराष्ट्रातच का?' नाशिक, संभाजीनगरमधील घटनेवरून रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar On Nashik Sambhajinagar Violence : "महाराष्ट्रात निवडणुका येत असल्याने महाराष्ट्रात धार्मिक धृवीकरण करण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी काही धर्मांध शक्ती प्रयत्नशील असल्या तरी हा विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या संताचा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे."

Jagdish Patil

Rohit Pawar News : महाराष्ट्रात निवडणुका येत असल्याने महाराष्ट्रात धार्मिक धृवीकरण करण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी काही धर्मांध शक्ती प्रयत्नशील असल्या तरी हा विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या संताचा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे.

त्यामुळं धर्मांध शक्तींच्या मनसुब्यांना हा महाराष्ट्र नक्कीच उधळून लावेल असा विश्वास व्यक्त करत असे मोर्चे गुजरातमध्ये का निघत नाहीत ते महाराष्ट्रातच का निघतात? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केला आहे.

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील काही शहरात या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. या वक्तव्याप्रकरणी महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, या महाराजांविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सिन्नर येथील हरीनाम सप्ताहाला भेट दिली यावेळी ते रामगिरी महाराजांसोबत एकाच व्यासपीठावर बसले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी महाराजांचा संत म्हणून उल्लेख केला. यावरुन आता विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.

अशातच आता नाशिक (Nashik) आणि संभाजीनगरमधील दंगलीच्या घटनांवरुन रोहित पवारांनी सरकारच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच राज्यात दंगली घडवण्यासाठी काही धर्मांध शक्ती प्रयत्नशील असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्र हा संताच्या, वारकरी संप्रदायाच्या विचारांवर चालणारा असून हे विचार मानवता, समता, बंधुता, प्रेम याची शिकवण देतात. द्वेषाची हिंसेची शिकवण कदापि देत नाहीत. त्यामुळं संताच्या नावाखाली जनतेच्या भावनांशी खेळून द्वेषाची पेरणी करुन महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते संताच्या विचारांच्या विरुद्ध आहे, असं म्हणत त्यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

तसंच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या असतील तर माणूस म्हणून निषेध करायलाच हवा, जो आपण करतच आहोत. परंतु निषेध मोर्च्यांच्या आडून कुणी राजकीय पोळ्या शेकण्यासाठी द्वेष पसरवत असेल तर ते मात्र योग्य नाही. असे मोर्चे गुजरातसह इतर राज्यांमध्ये का निघत नाहीत? तिकडं निवडणुका नाहीत म्हणून का? महाराष्ट्रातच का निघतात? याचा विचार करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात निवडणुका येत असल्याने महाराष्ट्रात धार्मिक धृवीकरण करण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी काही धर्मांध शक्ती प्रयत्नशील असल्या तरी हा विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या संताचा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं धर्मांध शक्तींच्या मनसुब्यांना हा महाराष्ट्र नक्कीच उधळून लावेल असा विश्वास आहे. द्वेषाचे मुद्दे बाजूला सारून हाताला काम आणि पोटाला अन्न ही सर्वसामान्य जनतेची प्राथमिकता असून यावर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला हवी आणि ती होईलच, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.

हे भाजपचे पोसलेले संत

दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रामगिरी महाराज हे भाजपचे पोसलेले संत असल्याचं म्हटलं आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "हे रामगिरी कसले संत, मुख्यमंत्र्यांनी जबाबदार पदावर असताना सांभाळून बोलावं. हे भाजपचे पोसलेले संत आहेत. हे भाजपचे चमकोगिरी संत आहेत. तेढ निर्माण करणाऱ्याला समर्थन असेल ही गंभीर बाब आहे. राज्यात दंगली घडवण्याची यांची मानसिकता आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT