चेतन देशमुख
Yavatmal News : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सत्तेचा गड काबीज केला. निवडणुकीत तीनही मंत्री पास झाले असून राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांचा स्ट्राईक रेट 100 टक्के राहिला. संजय राठोड डिस्टिंग्शनमध्ये आले असून अशोक उईके मात्र काठावर पास झाले.
पालकमंत्री राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेनेने 10 जागा लढविल्या. यातील एका जागेवर न्यायालयाच्या निर्णयामुळे अर्ज बाद झाला. उर्वरित नऊ पैकी सात जागा जिंकत सेनेने ताकद दाखवून दिली. पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 70 टक्के स्ट्राईक रेट नोंदविला. तीन जागांवरील पराभव वगळता शिवसेनेने सहकार क्षेत्रातील आपले राजकीय वजन कायम असल्याचे दाखवून दिले. महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे.
आठ जागा लढविणाऱ्या भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. या सत्तासंघर्षात भाजपला सर्वाधिक जागांवर पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ही निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रातील सत्तेची लढाई नव्हती, तर महायुतीतील घटक पक्षांच्या राजकीय ताकदीचीही परीक्षा होती. या परीक्षेत राष्ट्रवादीने अपेक्षेपलीकडील कामगिरी केली. सहाच्या सहा जागांवर विजय मिळविणे हे इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वावरील मतदारांचा विश्वास अधोरेखित करणारे ठरले. एकही जागा गमवावी न लागल्याने महायुतीत राष्ट्रवादीने स्वतंत्र ताकद सिद्ध केली. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची राहणार आहे.
भाजपचा आठपैकी पाच जागांवर पराभव
भाजपसाठी ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली. आठ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळविता आला. पाच जागांवरील पराभवामुळे पक्षाचा स्ट्राईक रेट अवघ्या ३७.५ टक्क्यांवर राहिला. राज्यातील सत्तेत महत्त्वाची भूमिका असलेल्या भाजपला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळविता आले नाही. मंत्री अशोक उईके, मदन येरावार यांच्यासह पक्षातील नेत्यांसाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.
आमदार किसान वानखडे यांच्या मतदारसंघातील कामगिरीही लक्षवेधी ठरली. मतदारसंघांत दोन जागांपैकी एक जागा जिंकण्यात यश आले. दुसरी जागा मात्र ईश्वरचिठ्ठीमुळे गमवावी लागली. त्यामुळे या मतदारसंघांतील निकालात नशिबाचाही कौल निर्णायक ठरल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.