Sanjay Rathod | Bhavana Gawali  Sarkarnama
महाराष्ट्र

Bhavana Gawali : भावना गवळी तिकिटापासून 'वंचित'; तरी उमेदवारी 'निश्चित'!

Shiv Sena : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात तिघे शिवसैनिक ऐकमेकांच्या विरोधात उभे दिसणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोणता शिवसैनिक सर्वांना भारी ठरतो हे पाहण्यासारखे असेल.

Sachin Deshpande

Yavatmal Washim Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार असा विक्रम करणाऱ्या भावना गवळी यांना महायुती तिकीट देण्याची शक्यता धुसर झाली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या प्रतोद असलेल्या भावना गवळी यांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट घोषित करतो, असे सांगत शिवसेना संजय राठोड यांच्या गळ्यात माळ टाकण्याच्या तयारीत आहे.

या सर्व प्रक्रियेत संजय राठोड यांना त्यांची जुनी भाजप मैत्री तिकिटासाठी हात आणि निवडणुकीत साथ देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, पण या निवडणुकीतून भावना गवळी या माघार घेणार नसून त्यांना तिकिटासाठी जरी 'वंचित' ठेवले तरी त्या दमदार उमेदवार म्हणून समोर येतील आणि यवतमाळ-वाशीममध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आल्या. शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांचे तिकीट शिवसेनेतून कापले जाणार की, महायुतीच्या नेत्यांद्वारे कापले जाणार आहे, यावर जोरदार चर्चा रंगली आहे. शिंदे गटात केवळ भावना गवळी यांचे तिकीट कापण्यामागे नेमके राजकारण काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

त्यामुळे गवळी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर खासदार गवळी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कायम साथ दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रतोदपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

असे असताना शिंदे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत गवळी यांना वगळण्यात आल्याने त्यांचे तिकीट अनिश्चित आहे. दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ-वाशीम येथे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर 4 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना अद्याप उमेदवारी घोषित न झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून गवळी या सहाव्यांदा इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत गवळी यांचे नाव नक्कीच असेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, या यादीत त्यांचे नावच न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्यांच्या जागेवर शिंदे गटाकडून संजय राठोड (Sanjay Rathod) यांना संधी देण्याची चर्चा आहे. त्यामुळे गवळी यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर करा, नाहीतर आम्ही राजीनामे देणार,असा गर्भित इशाराच शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे गवळी यांना उमेदवारी न दिल्यास वाशीम-यवतमाळमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सोमवारी रात्री भावना गवळी यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची तब्बल २० मिनिटे भेट घेतली. पण, भेटीला जाण्यापूर्वी माध्यमांशी भेटीवरून आल्यावर बोलण्याचे त्यांचे वचन त्यांनी पाळले नाही आणि त्या थेट निघून गेल्या. त्यामुळे महायुतीत त्यांचे तिकीट कापले गेल्याचे आणि त्या ठिकाणी संजय राठोड यांना भाजप (BJP) मैत्रीचे बक्षीस देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भावना गवळी या पाच वेळा खासदार आहेत. त्या यंदा सहाव्यांदा लोकसभेत जाण्यासाठी उभ्या राहत आहेत. विविध चौकशांचा ससेमिरा त्यांच्यामागे लावण्यात आला असून, त्यामुळे त्यांचे तिकीट कापले जाणार आहे. पण, अशा परिस्थितीतदेखील भावना गवळी यांनी लढण्याचे ठरविले असल्याची माहिती समोर येत आहे.

भावना गवळी यांना शिवसेनेच्या तिकिटापासून 'वंचित' ठेवण्यात येणार आहे. पण, त्या 'किंचित'ही मागे राहणार नसून 'निश्चित' लोकसभा निवडणूक लढणार आहे. त्यांच्यामागे मोठ्या संख्येत असलेल्या महिला बचत गटांची व महिलांची शक्ती पाहता यवतमाळ-वाशीम मतदारसंघात भावना गवळी सहाव्यांदा चमत्कार करतील काय, असा प्रश्न मतदारांना आहे.

शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याच बरोबर केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला गेल्या दहा वर्षांत साथ देणाऱ्या भावना गवळी यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वाढली आहे. असे असले तरी पाच वेळा चमत्कार करणाऱ्या भावना गवळी सहाव्यांदा काय चमत्कार शिवसेनेच्या या मतदारसंघात करतात हे पाहण्यासारखे असेल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT