Chhatrapati Sambhajinagar: निवडणुकीत पराभव झाला की विजयी उमेदवाराच्या घरावर हल्ला, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची असे प्रकार नेहमीचेच. पण छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील वडोद बाजार या गटातील पराभूत उमेदवार मंगेश साबळे यांनी थेट भाजपचे विजयी उमेदवार गोपाळ वाघ यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. वाघ यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेत त्यांचा सत्कार केला आणि मोठ्या मनाने पराभव स्वीकारत विरोधकाचा विजयही पचवला.
वडोद बाजार गटाची निवडणुक आणि लागलेला निकाल यांची जिल्हा नाही तर राज्यभरात चर्चा झाली. कारण जिल्हा परिषदेची निवडणुक जाहीर झाल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढलेल्या मंगेश साबळे यांनी स्वतःच आपण वडोद बाजार गटातून शिवसेनेकडून लढणार असल्याची घोषणा केली होती. आधी घोषणा, मग पक्ष प्रवेश आणि प्रत्यक्ष उमेदवारी असा हा अवघ्या महिनाभरातील घटनाक्रम होता.
एका गावचे सरपंच असलेले मंगेश साबळे हे आपल्या वैविध्यपूर्ण आंदोलनासाठी ओळखले जातात. कधी नोटांची उधळण, तर कधी स्त्री वेशाषात थेट सीईओच्या चेंबरमध्ये जाऊन पाणी प्रश्नावरचे आंदोलन अशी अनेक आंदोलन त्यांनी गाजवली ज्याची चर्च राज्यभरात झाली. मराठा आरक्षण आंदोलनात भर रस्त्यात आपली कार जाळून त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष आपल्याकडे वधले होते.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मंगेश साबळे लढले. मराठा आरक्षण आंदोलनामुळे साबळे यांना दीड लाखाहून अधिक मते मिळाली आणि दानवे यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते राज्याच्या राजकारणातील एक चर्चित चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वडोद बाजार गटातून त्यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवली. अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर सारखे नेते त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील होते. मतदानानंतर जेव्हा प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या मंगेश साबळे यांचा विजय गृहित धरून त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही सुरू केला.
प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली. आमदार सुरेश धस सारख्या नेत्याने त्यांना अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या. पण शेवटच्या फेरीत गेम फिरला आणि मंगेश साबळे पराभूत झाल्याचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर काहींनी शंका उपस्थितीत केल्या पण त्या निरर्थक होत्या. पराभवानंतर मंगेश साबळे यांनी केलेल्या कृतीने त्यांच्यातील खिलाडू वृत्तीचे दर्शनही घडले.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मंगेश साबळे यांनी वडोद बाजार गटातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. निवडणूक प्रक्रियेत जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. पराभव स्वीकारत पुढील काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे उमेदवार गोपाल वाघ यांच्या घरी जाऊन मंगेश साबळे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गोपाल वाघ यांच्या आई तथा माजी जिल्हा परिषद सदस्य इंदुबाई वाघ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवाराच्या घरी जाऊन कुटुंबीयांचा सन्मान करणे ही राजकारणात दुर्मिळ बाब मानली जाते. साबळेंच्या या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.