नवी दिल्ली : चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी आज पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. शपथ घेतल्यानंतर तासाभरातच त्यांनी मोठे निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला आहे.
मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा शपथविधी आज झाला. चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता. राहुल गांधी हे आजच्या शपथविधीसाठी राजभवनावर हजर होते. त्यामुळे ते राज्यातील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केल्या. ते म्हणाले की, यापुढे कृषीपंपांसाठी वीजबिल असणार नाही. याचबरोबर गरीब कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही. वीजपुरवठा खंडित झालेल्या असल्यास तो तातडीने जोडण्यात येईल आणि वीजबिल माफ केले जाईल. पंजाबची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो.
मी तळागाळातील वंचित घटक, रिक्षा ओढणारे आणि इतरांचा प्रतिनिधी आहे. गुन्हेगारी माफियांनी माझ्या कोणत्याही कामासाठी अजिबात येऊ नये, असा जाहीर इशाराही चन्नी यांनी दिला. माझे सहकारी असलेले उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी हे दोघेही कार्यक्षम आहेत. त्यांच्यासोबत मी काम करीत राहीन, असेही चन्नी यांनी नमूद केले.
प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध होता. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले गेले नाही. तसेच, प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड केल्यानं त्यांचे नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर रंधवा यांच्या नावावर चर्चा झाली होती. अखेर चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.