MCA  Sarkarnama
मुंबई

मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकवले मुंबई पोलिसांचे १५ कोटी रुपये!

विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३५ स्मरणपत्रे पाठविली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई क्रिकेट (cricket) असोसिएशनच्या (MCA) क्रिकेट सामन्यासाठी मुंबई (mumbai) पोलिस (police) सुरक्षा पुरवतात आणि त्यासाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३५ स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. (14.82 crore dues of Mumbai Police to Mumbai Cricket Association)

मुंबई क्रिकेट असोसिएशन ३० स्मरणपत्रे पाठवूनही १४.८२ कोटींची थकबाकी भरण्यास तयार नाही. याबाबत १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष पोलिस मुख्यालयात भेट घेऊन थकबाकी न भरणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची मालमत्ता जप्तीची मागणी केली आहे. नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थकबाकी माफीची मागणी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला विविध क्रिकेट सामन्यांसाठी दिलेली सुरक्षा आणि त्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा शुल्काची विषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांनी अनिल गलगली यांना गेल्या ८ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, वर्ष २०१३ मध्ये झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष २०१६ चा विश्वचषक टी -२०, वर्ष २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या ८ वर्षात केवळ २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क तेवढे भरले आहे. ता. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही. कारण किती शुल्क आकारले जावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही.

मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, अद्यापपर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुल्क न भरल्याबद्दल मुंबई पोलिसांनी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्रही लिहिले आहे, असेही गलगली यांनी स्पष्ट केले.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहून मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकबाकी न भरल्याबद्दल एफआयआर नोंदवावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे वसुलीसाठी कार्यवाही करत असोसिएशनची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी केली आहे. कोट्यवधीची कमाई करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची थकबाकी माफ करणे आणि तशी मागणी करणे चुकीचे आहे, असे गलगली यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT