Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राजकीय पक्षांकडून अनेकदा बॅनरबाजी करण्यात आली. भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा वेगवेगळ्या नेत्यांचे बॅनर झळकले. या बॅनरची जोरदार चर्चाही झाली. ही चर्चा सुरू असतानाच, आता ठाणे शहरात काँग्रेसने भावी पंतप्रधान म्हणून लावलेले बॅनर चर्चेत आले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आज (१९ जून) वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्यानिमित्ताने अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देणारे बॅनर ठाण्यात झळकले आहेत. त्या बॅनरवर राहुल गांधींना भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सध्या या बॅनरची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील विविध भागात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या पक्षातील कार्यकर्त्यांनी आपआपला नेता मुख्यमंत्री व्हावा, या उद्देशाने भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते. नुकतेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर त्यांना भावी मुख्यमंत्री अल्लेख करत शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्या बॅनरचीही मोठी चर्चा झाली.
त्यानंतर आता काँग्रेसने राहुल गांधी यांची देशाचे भावी पंतप्रधान अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे बॅनर ठाणे जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेरील सिग्नलवर तसेच मुस रोडवर लावण्यात आले आहेत. हे बॅनर काँग्रेस पक्षातील दिवंगत माजी आमदार क्रांती कोळी समर्थक असलेले ठामपा शिक्षण मंडळ उपसभापती नंदकुमार मोरे यांनी लावले आहेत.
दरम्यान, त्या बॅनरवर "नफरत छोडो, भारत जोडो" असाही उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी यांना कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार युवकांचा आवाज, भारताचे संविधान व लोकशाहीच्या संरक्षणासाठी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढलेले काँग्रेसचे निर्भिड नेते भावी पंतप्रधान राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे म्हटले आहे.
तसेच त्या बॅनरवर सोनिया गांधी, मल्लिलार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ठाण्यातील स्थानिक काँग्रेसच्या नेत्या शिल्पा सोनाने यांचे छायाचित्रे आहेत. काँग्रेसने लावलेल्या भावी पंतप्रधान या बॅनरने ठाण्यात मोठी चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे काय म्हणाले?
"काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना पक्ष आहे. सर्वाधिक काळ काँग्रेसने देशाचं नेतृत्व केलं आहे. राहुल गांधी हे या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे या पक्षात भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहणे हे कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन योग्य आहे. त्यांनी आपली इच्छा प्रकट करणं, यात चुकतं कुठं. सध्या राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे निश्चितच दावेदार आहेत", अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ठाणे शहर मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिली.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.