Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवाप्रमुख आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या मुंबईतील भूखंडांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं दिसून येत आहेत. ठाकरे यांनी सोमवारी (ता.10 ऑगस्ट) मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी तातडीनं महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, ठाकरेंनी महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भेट मुंबईतील मोकळ्या जागांच्या संदर्भात घेतल्याचं स्पष्ट केलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जवळपास 16 एकर सार्वजनिक जमीन आणि मोकळे भूखंड भाजपशी संबंधित एका खासगी ट्रस्टला (श्री विले पार्ले केळवाणे मंडळ - SVKM) देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
तसेच मुंबईच्या मोकळ्या जागा लाटण्याचा भाजपचा डाव असून तो शिवसेना कडाडून विरोध करून हाणून पाडणार असल्याचा इशाराही आदित्य ठाकरेंनी यावेळी दिला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.
आदित्य ठाकरे म्हणाले, आजची भेट ही वरळीतील स्थानिक प्रश्नांबाबत होती. वरळीतील स्थानिकांना घरे मिळाली पाहिजेत. तसेच शाळा आणि पाण्याचे प्रश्नही महापालिका आयुक्तांसमोर मांडले. मात्र, मुंबईतील मोकळ्या जागांसाठीचा लढा मोठा आहे. मुख्यमंत्र्यांसोबतही हा लढा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच हे सरकार त्यांच्या मित्रांना आणि भाजपच्या आमदारांना 16 एकर जागा देत आहे. अंधेरीतील जागाही देण्यात आली आहे. 400 कोटी रुपयांचा प्लॉट केवळ 21 लाख रुपयांना देण्यात आल्याचा गंभीर आरोपही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही मोर्चा काढणार असल्याची घोषणाही केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या मोर्चात राजकारणाच्या पलीकडचे लोकही सहभागी होणार आहेत. मोर्चाची तारीख आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. त्यांनी भाजपवर निशाणा साधताना मुंबईतील सर्व जागा बळकावण्यास सुरुवात केली असून अनेक मोकळी मैदाने बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव आम्ही हाणून पाडणार असल्याचा निर्धारही बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.