मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसारच आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा निकष लावून शिवसेनेचा (Shivsena) निर्णय घ्यायचा होता, तर आमच्याकडून स्टॅम्पपेपरवर शपथपत्रे का घेतली. आयोगाचा सर्व भोंगळ कारभार पाहता विद्यमान निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. तसेच, निवडणूक प्रक्रियेद्वारेच निवडणूक आयुक्तही नेमले गेले पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. (Abolish the Central Election Commission : Uddhav Thackeray)
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री ठाकरे हे आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आयोगाच्या बरखास्तीची मागणी केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आम्ही शपथपत्र सादर केली हेाती. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली. आयोगानेच त्यात असत्य असं काहीच नाही, असे पत्रही आम्हाला पाठविले. भरपावसात आम्ही पदााधिकाऱ्यांची शपथपत्रे दाखल केली, त्यानंतरही आयोगाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवर शिवसेनेसंदर्भात निर्णय दिला. पण, हे लोक पात्र आहेत की अपात्र याचा निर्णय अगोदर व्हायला पाहिजे.
आयागोला लोकप्रतिनिधींचा निकष लावायचा होता, तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली. आमच्याकडून स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रं का घेतली. शिवसेनेच्या कार्यकारिणी सभेचा तपशील दिला नाही, असे आयोगाकडून सांगण्यात आले. पण आम्ही तर सीडीसुद्धा दिली होती. त्यावर आयोगाचं म्हणणं असं आहे की, कव्हरिंग लेटरमध्ये काही लिहिलेले नाही, असे ठाकरे म्हणाले
त्यासंदर्भात ॲड. कपिल सिब्बल यांनी सांगितले की, तुमच्याकडे जे विषय येतात, त्याचं गांभीर्य तुम्हाला कळत नाही का. तुम्ही फक्त कव्हरिंग लेटर वाचून निकाल देता का. त्या पाकिटात काय आहे, ते बघता की नाही, अशी विचारणा त्यांनी आयोगाला केली आहे. त्यामुळे हा सर्व भोंगळ कारभार पाहता विद्यमान निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेद्वारेच निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत, अशी शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागणी आहे.
निवडणूक आयोगाचा हा निकाल मी मानायला तयार नाही. परवा अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले आणि म्हणाले की, भाजप-शिवसेनेची युती. ती ही युती नाही. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे. जे शिवधनुष्य रावणाला पेललं नाही, ते मिंद्यांना काय पेलणार आहे. त्यांना ते पेलणंच शक्य नाही. त्यांच्या मागे शिवसेना संपविण्याचा जो कट आहे. ज्या केसेसमुळे ते तिकडे गेले आहेत, त्यात केसेसमध्ये त्यांना संपवलं आणि शिवसेना संपली, असा जर दिल्लीश्वरांचा डाव असेल तर ते एवढं सोप नाही. शेवटची आशा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.