Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

खरी शिवसेना आमचीच असल्याचे आता तरी मान्य करा !

Eknath Shinde : आम्हीच हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) आधी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि आता ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले हा तर बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. ढाल-तलवार हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्र आहे.त्यामुळे हे चिन्ह लोकांपर्यंत पोहचवणे आमच्यासाठी अवघड नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडे मागितलेल्या पिंपळाचे झाड, ढाल-तलवार आणि तळपता सूर्य तीन चिन्हांपैकी ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने सोमवारी मशाल हे चिन्ह दिल्यानंतर सेनेत एक नवे चैतन्य निर्माण झाले आहे. या पाश्‍र्वभूमीवर शिंदे गटाला आज ढाल-तलवार हे चिन्ह मिळाल्याने शिंदे गटातही उत्साहाचे वातावरण आहे. बाळासाहेबांची शिवसेना हे पक्षाचे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह मिळाल्याने आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

आम्हीच हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार. सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू ढाल, या शब्दात ट्विट करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहे. आमची शिवसेना हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना असून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम बाळासाहेबांप्रमाणेच आम्ही करत राहू, अशी भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्हावरून शिवसेनेच्या दोन गटात सुरू असलेला वाद तात्पुरता का होईना मिटला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक येत्या तीन नोव्हेंबरला आहे. या निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसात सुरू होईल. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या बाजूने महाविकास आघाडी मैदानात उतरणार असून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीसोबत त्यांचा सामना होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT