Sanjay Raut sarkarnama
मुंबई

खासदार संजय राऊतांवरील कारवाईचे मूळ ‘म्हाडा’ने केलेल्या ‘त्या’ तक्रारीत

या व्यवहारात हाती काहीच न लागल्याने ‘म्हाडा’ने २०१८ साली मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ विकसन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना आज सायंकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या कारवाईचे मूळ ‘ईडी’ नव्हे तर ‘म्हाडा’ आहे. ‘म्हाडा’ने चार वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीच्या आधारे आज ‘ईडी’च्या माध्यमातून खासदार राऊतांच्या अटकेपर्यंत हे प्रकरण आले आहे.

खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर ‘ईडी’च्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात या साऱ्या प्रकरणाचा तपशील देण्यात आला आहे. एकुण एक हजार ३९ कोटी ७९ लाख रूपयांच्या फसवणुकीचे हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. खासदार राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू कन्स्ट्रक्शन या कंपनीने गोरेगाव येथील पत्रा चाळ हा निवासी भाग विकसनासाठी घेतला.

झालेल्या करारानुसार या निवासी भागातून होणाऱ्या बांधकामांपैकी ३७२ सदनिका मूळ रहिवाशांना तर तीन हजार सदनिका ‘म्हाडा’ला द्यायच्या होत्या. मात्र, यातील कोणतेच काम पूर्ण न करता गुरू कन्स्ट्रक्शन कंपनीने या जागेवर मिळालेला ‘एफएसआय’ नऊ इतर कंपन्यांना विकला. विकलेला ‘एफएसआय’ व मूळ प्रकल्पातील एकुण व्यवसाय एकत्रित केला तर तब्बल एक हजार ३९ कोटी ७९ लाख रूपयांची ही फसवणूक आहे.

या व्यवहारात हाती काहीच न लागल्याने ‘म्हाडा’ने २०१८ साली मुंबई पोलिसांच्या अर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे गुरू कन्स्ट्रक्शनचे प्रवीण राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. पुढे हे प्रकरण राज्य सरकारकडून दाबले जात असल्याचे लक्षात येताच ‘ईडी’कडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर ‘ईडी’ने या प्रकरणाच्या तपासाला सुरवात केली.

‘ईडी’ने तपासात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे खासदार संजय राऊत यांच्या मालकीची तब्बल ११ कोटी १५ लाख ५६ हजार रूपये किमतीची स्थावर मालमत्ता जप्त केली. या प्रकरणात खासदार राऊत यांना ‘ईडी’ने एक जुलैला चौकशीसाठी बोलविले होते. त्यावेळी त्यांची चौकशी झाली. मात्र, त्यानंतर समन्स बजावूनदेखील चौकशीला येण्यासाठी खासदार राऊत यांनी वेळ मागून घेतली. मात्र, आधी दोनदा समन्स बजावल्याने यावेळी तिसऱ्यांदा समन्स बजावूनदेखील विविध कारणे सांगत चौकशी टाळणाऱ्या खासदार राऊत यांचे घर ‘ईडी’च्या आधिकाऱ्यांनी आज सकाळी गाठले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT