मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या वेगवेगळ्या खटल्यांमुळे चर्चेत आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगनाविरूध्द मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यापासून कायमस्वरुपी मुभा मिळावी, अशी मागणी कंगनाने केली होती. न्यायालयाने (Court) यावर कंगनाला फटकारले आहे. कंगना एक आरोपी आहे, हे तिने विसरू नये, असेही न्यायालयाने सुनावले आहे. (Kangana Ranaut News)
कंगनाची याचिका फेटाळून महानगर न्यायदंडाधिकारी आर.आर.खान म्हणाले की, यातील आरोपी हीच आता हा खटला कसा चालवावा, हे सांगू लागली आहे. खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा आरोपी मागू शकत नाही. आरोपीला कायद्यातील प्रक्रियेचे पालन करावे लागेल. याचबरोबर तिला जामिनाच्या अटीही पाळाव्या लागतील. या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात सहकार्य करण्याच्या हेतूने आरोपी आतापर्यंत हजर राहिलेली नाही.
कंगना ही सेलिब्रेटी असेल, तिला व्यावसायिक जबाबदाऱ्या असतील. पण तिने हे विसरू नये की ती आरोपी आहे. खटल्याचे काम निष्पक्षपातीपणे चालण्यासाठी आरोपीचे सहकार्यही आवश्यक असते. आरोपीने या खटल्याच्या सुनावणीस उपस्थित राहण्याची गरज नाही, असा समज करुन घेतला आहे. आपला वकील सगळे पाहून घेईल, असे आरोपीला वाटत आहे. आरोपीला हजर न राहण्याची मुभा दिल्यास तक्रारदारावर अन्याय केल्यासारखे होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, अंधेरी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयावरील विश्वास उडाल्याचे कंगनाने म्हटले होते. हा खटला दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग करावा, अशी मागणीही तिने केली होती. यासाठी तिने मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज केला होता. यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने कंगनाची मागणी फेटाळून लावली होती. याला कंगनाने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत कंगनाला दणका दिला होता. कंगनाविरोधात अटक वॉरंट काढण्याचा इशारा न्यायालयाने नुकताच दिला होता. मुंबईतील अंधेरी येथील महानगर न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले होते. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला होता. कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु. ती त्याला उत्तर देत नव्हती. या प्रकरणात कंगना सुरवातीला एकदाही न्यायालयात सुनावणीला हजर राहिलेली नव्हती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.