Mumbai, 05 December : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज (ता. ०५ डिसेंबर) अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनात मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदेंनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे. तो विक्रम या अगोदर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर होता.
महायुती सरकारला (Mahayuti) राज्यातील जनतेने मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा सत्ता दिली आहे. त्यानंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपने मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला नकार दिला होता. मात्र, शेवटच्या क्षणी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे, त्यामुळे शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री या राज्यातील तीनही महत्वाच्या पदावर काम करणारे एकनाथ शिंदे हे दुसरे नेते ठरले आहेत. शिंदे यांच्या अगोदर हा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर होता. तो आता शिंदे यांच्याही नावावर झाला आहे.
एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले होते. त्या वेळी शिवसेना ही विरोधी पक्षात बसली होती. त्या वेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले होते, त्यामुळे शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या तीनही प्रमुख पदावर केले आहे.
शिंदे यांच्या अगोदर ही तीनहे पदे देवेंद्र फडणवीस यांनी भूषवली होती. फडणवीस यांनी 31 आक्टोबर 2014 पासून 12 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यानंतर 2019 मध्येही फडणवीस यांनी पाच दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मात्र, अजित पवार यांना माघार घ्यावी लागल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले होते. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले होते. त्यात सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले होते. म्हणजे फडणवीस यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या तीनही पदावर काम केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.