Supriya Sule  Sarkarnama
मुंबई

Ncp News : राष्ट्रवादीला 'बॅनरबाजी'चं ग्रहण ; जयंत पाटील,अजितदादांनंतर सुप्रिया सुळेचंही बॅनर

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule News : एकीकडे कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार ऐनभरात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंचाही पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकला आहे. यामुळे राष्ट्रवादीसाठी 'भावी मुख्यमंत्री'पदाची बॅनरबाजी डोकेदुखी ठरत आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचंही भावी मुख्यमंत्री उल्लेख केलेलं पोस्टर लावण्यात आलं होतं. महत्वाची बाब म्हणजे या पोस्टरवर कोणत्याही समर्थकांचं, पदाधिकाऱ्यांचं नाव लिहिण्यात आलेलं नव्हतं. याचदरम्यान, आता सुप्रिया सुळेंचे बॅनरही बॅनर झळकल्यामुळे राजकीय वर्तुळासह राष्ट्रवादीतही चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पक्षातील प्रमुख नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले जात आहे. सुरुवातीला ही गोष्ट राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींनी गांभीर्यानं घेतली नव्हती. आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रेमाखातर समर्थकांकडून ही पोस्टरबाजी करण्यात येत असावी असं मत पक्षातील नेत्यांचं होतं. मात्र, पक्षातील ज्या नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे अशा नेत्यांची एकापाठोपाठ भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर झळकल्यानं आता राष्ट्रवादीची मोठी पंचाईत झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर लावलेल्या या बॅनरमागील सूत्रधाराचा शोध राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा करत असल्याचा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाचं मत आहे. या संपूर्ण प्रकरणी लवकरच पक्ष कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला पोस्टर लावण्यात आले होते. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे पोस्टर लागले आहे. त्यात महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, काहीच वेळात हे पोस्टर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तत्काळ काढून टाकण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…?

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर खासदार सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर लावण्यात आले आहे. यावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या, एकतर पोस्टर कोणी लावलं? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे पोस्टवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही.

एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावणे. याचाही कुणाला अधिकार नाही. जर कोणी लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे. माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT