Tribal reservation1 Sarkarnama
मुंबई

Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांसह आमदार आणि खासदारांनी मंत्रालयातील जाळीवर घेतल्या उड्या, कारण काय?

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ, आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, भाजप खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या घेतल्या. याप्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर आणि धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षणाला विरोधासाठी नरहरी झिरवाळ यांनी आक्रमक होत हा प्रकार केला.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा (Reservation) प्रश्न पेटला आहे. आदिवासींमधून त्यांना आरक्षण देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. याला आदिवासी आमदारांनी तीव्र विरोध केला आहे. आदिवासी समाजाचा सर्व आमदार याबाबत एकटवले असून, आंदोलन सुरू केलेले आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी समाजाचे आमदार आणि खासदार मंत्रालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आदिवासी समाजाचे इतर आमदार देखील सहभागी झालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी बैठक होती. पण ही बैठक निष्फळ झाली. यानंतर आदिवासी आमदार आज आक्रमक झाले. नरहरी झिरवाळ यांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्रालय इमारतीच्या मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उडी घेतली. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा, भाजप खासदार हेमंत सावरा, आमदार राजेश पाटील, काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी देखील उडी घेतल्या.

नरहरी झिरवाळ आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आंदोलक आमदारांनी अचानक, असा प्रकार केल्याने आणि संरक्षण जाळीवर उडी घेतल्यानं मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. पोलिसांनी जाळीकडे धाव घेत, नरहरी झिरवाळ आणि इतर आमदारांना तेथून बाहेर काढलं. सुरक्षा यंत्रणेने वैद्यकीय पथक दाखल केले. वैद्यकीय पथकानं नरहरी झिरवाळ यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढलेला होता.

झिरवाळ यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

आमदार नरहरी झिरवाळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. जाळीवर काढल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रक्तदाब वाढलेल्या परिस्थितीत झिरवाळ आंदोलन करत असल्याने वैद्यकीय पथक त्यांच्याभोवती आहे. "सरकारने आदिवासी आरक्षणाला धक्का लावू नये आणि इतर मागण्यांसाठी दुर्लक्ष केल्यास, आमच्याकडे बी-प्लान तयार आहे", असा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिला.

मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांशी भेट घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. पेसा कायद्यातंर्गत भरती प्रक्रिया राबवावी, आदिवासी आरक्षणाविषयी ठोस आश्वसन घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा आंदोलक आमदारांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT