Jayant Patil
Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Video Jayant Patil : अनेक नेते जयंत पाटलांच्या संपर्कात, कुणी केला 'हा' दावा; मोठा राजकीय भूकंप घडणार?

Chaitanya Machale

Mumbai News : लोकसभेच्या निकालानंतर इतर पक्षात चुळबुळ सुरु झाली असून आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांना अनेक आमदारांचे फोन देखील आले असल्याचा दावा माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला चांगले यश आले आहे. दहा पैकी आठ जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे इतर पक्षांचे अनेक इच्छूक आमच्याशी संपर्क करत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अनेक आमदारांचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेला लागले त्यामुळे आमच्यातील जे नेते तिकडे गेले होते. त्यांच्यामध्ये चुळबुळ आहे. अनेकांचा फोन प्रांताध्यक्षांना येतात. आम्हा सर्वांना येतात. आता पुढील काळात बघू काय करायचे ते असे सूचक वक्तव्य माजी मंत्री देशमुख यांनी केले आहे. आमच्याकडे पुन्हा येण्याचा विचार करण्यांबाबत कोणता निर्णय घ्यायचा यावर पक्षाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून त्यानंतर निर्णय होईल.

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना बरोबर घेत राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला जाहीर पाठींबा दिला. त्यानंतर अजित पवार हे सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर त्यांच्याबरोबर असलेल्या इतर नेत्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये महत्वाच्या खात्यांची मंत्रिपदे देण्यात आली.

यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचा प्रामुख्याने समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांनी काढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह देखील काही अटींवर अजितदादा यांना वापरण्याची परवानगी देण्यात आली.

लोकसभा निवडणूकीला सामोरे जाताना अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप बरोबर महायुतीच्या माध्यामातून लढली. तर शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस यांनी महाविकास आघाडी करुन निवडणूक लढविली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याने पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे येण्याची तयारी दाखविली असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळात निश्चित होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT