Political News: महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह दिल्लीतील काँग्रेसचे दिग्गज नेतेही उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाली. याबरोबरच आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने नेमकी काँग्रेसची रणनीती कशी असणार? याबाबतही हायकमांडने राज्यातील नेत्यांना महत्वाचा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे.
तसेच राज्यात राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार का? गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, याबरोबरच आज काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या सर्व विषयांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, याबाबत बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या फक्त अफवा होत्या. आता या अफवाला पूर्ण विराम मिळाला आहे. तसेच आज झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. तसेच याबाबतचं कामही सुरू झालेलं आहे", असं नाना पटोलेंनी सांगितलं.
काँग्रेस फुटण्याच्या चर्चांवर पटोले काय म्हणाले?
राज्यात शिवसेना फुटली. त्यानंतर राष्ट्रवादी देखील फुटली. यानंतर काँग्रेस फुटण्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, "आज झालेल्या बैठकीला काँग्रेसचे सर्व नेते होते. त्यामुळे या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.
भाजप जनतेच्या मूळ प्रश्नापासून लांब जात मुद्दामहून अशा चर्चा करतं. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं. पण भाजप यावर बोलत नाही. तर आधी शिवसेना तोडली. नंतर राष्ट्रवादी तोडली आणि आता काँग्रेस तोडण्याची चर्चा करतायेत, पण काही झालं तरी काँग्रेस तुटणार नाही", असं सांगत पटोले यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत नाना पटोलेंचं मोठं भाष्य
राज्यात राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामिल झाल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार, अशी चर्चा आहे. याबाबत बोलताना नाना पटोले यांनी मोठं भाष्य केलं. ते म्हणाले, "ती एक प्रोसेस आहे. त्यामुळे ते (विरोधी पक्षनेतेपद) आपोआप मिळणार आहे", असा दावा त्यांनी केला.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.