राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar : गेल्या तीन ते चार दशकांपासून ज्याही वेळेस महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या बदलाची चर्चा माध्यमात येते किंवा तशी एकूणच राजकीय परिस्थिती राज्यातील राजकारणात असते, अशा वेळेस भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दोन राजकीय घराण्याची नावे हमखास असतात आणि ती म्हणजे थोरात आणि विखे.
काही वर्षांपूर्वी स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचे नाव नेहमी राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आणि स्पर्धेत असायचे, त्याचबरोबर स्वर्गीय गोविंदराव आदिक यांचेही नाव अनेकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत राहिल्याचा मोठा इतिहास आहे. वास्तविक हे सर्वच नेते सहकारातील दिग्गज आणि आपल्या मतदारसंघात मोठा राजकीय वारसा, नेतृत्व, संघटन कौशल्य असलेले नेते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळताना राज्यही सक्षमपणे सांभाळू शकतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक राजकीय विश्लेषक आहेत.
मात्र यानंतरही बाळासाहेब थोरात असो स्वर्गीय बाळासाहेब विखे, स्वर्गीय गोविंदराव आदिक असो किंवा आता राधाकृष्ण विखे असो या सर्वांचीच नावे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत राहिलेली असली तरी त्यांना या पदापर्यंत पोहचण्यात यश आलेले नाही. आताच्या परिस्थितीतही राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असताना 16 बंडखोर शिवसेनेच्या आमदारांचे निलंबन झाले आणि सरकार कोसळले तर राधाकृष्ण विखे हे भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशी मोठी चर्चा राज्यभर दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विचारवंत,लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी संगमनेर मध्ये एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात हे राज्यातील एक विश्वासू आणि सक्षम नेतृत्व असून मुख्यमंत्री पदासाठी ते योग्य असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची प्रगल्भता आणि राजकीय क्षमता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात आहे. सध्याच्या परिस्थितीत चांगले दिवस आले असल्याने बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी पृष्ठी डॉ.कसबे यांनी केली आहे.
1985 पासून 2019 पर्यंत सलग 8 वेळा थोरात संगमनेर मतदारसंघातुन सातत्याने मोठ्या मताधिक्याने काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळात कृषी,पणन,महसूल अशी महत्वाची खाती सांभाळताना नगर जिल्ह्यासह नाशिक,औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविलेले आहे. प्रशासनावर एक चांगला वचक, राज्याची परिपूर्ण माहिती, काँग्रेस पक्षात दिल्ली पातळीवर श्रेष्ठी आणि राष्ट्रीय नेते याच बरोबर विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांबरोबर बाळासाहेब थोरात यांचे जवळचे संबंध आणि चांगले संबंध राहिले आहेत.
असे असले तरी नगर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे राधाकृष्ण विखे यांच्याशी विखे काँग्रेस पक्षात असतानाही आणि आता विखे दुसऱ्या(भाजप) पक्षात असतानाही कधीही राजकीय सूत जुळले नाही. थोरात-विखे यां दोघांनीही नेहमीच जिल्हापरिषद, जिल्हा बँक आणि राज्याच्या राजकारणात एकमेकाला शह-काटशह देण्याचेचे काम आतापर्यंत दिले. या दोन्ही नेत्यांचे राज्यातील सहकार आणि एकूणच राजकीय वर्तुळात मोठे वजन असल्याने अनेकदा मुख्यमंत्री बदलाच्या काळात त्यांच्या नावांची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याबद्दल मोठी चर्चा झाली आहे. मात्र असे असले तरी ना थोरात ना विखे यांना अद्यापि मुख्यमंत्री पदाने हुलकवणीच दिल्याचे दिसून आले आहे.
आता राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षी जून महिन्यापासून झालेले मोठे फेरबदल पाहता आज मितीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधे झालेल्या फुटी मुळे राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. 2014 ला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास आणि त्यात काँग्रेस पक्षाचे अधिक आमदार निवडून आल्यास थोरात यांना मुख्यमंत्री पदाची संधी असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर जेष्ठ विचारवंत अभ्यासक डॉ.रावसाहेब कसबे यांनी थोरात हे सक्षम आणि विश्वासू नेतृत्व असल्याने ते मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचे मत नोंदवले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.