Dombivli News : शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. थरवळ यांच्या भूमिकेवर पक्षातील वरिष्ठांकडून समजूत घातली जात आहे. मात्र, 'मातोश्री'वरून अद्यापही थरवळ यांना काही उत्तर आलेले नाही. त्यामुळे थरवळ यांना 'मातोश्री'च्या निरोपाची प्रतीक्षा आहे. पदाला न्याय देता येत नसल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे ते सांगत असले तरी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात पद वाटप झाले. महानगरप्रमुख बंड्या साळवी यांची उपनेतेपदी निवड झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
थरवळ यांना या पदासाठी डावलले गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. यावरून शिंदे गटाने पक्षप्रमुख ठाकरे यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत दुटप्पी भूमिका आणि चांगल्या शिवसैनिकांना डावलले जाणे ही तर परंपरा असल्याचे म्हटले आहे. थरवळ यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपूर्त केला आहे. बुधवारपासून थरवळ यांच्या राजीनामाची जोरदार चर्चा कल्याण लोकसभा मतदारसंघात रंगली आहे.
थरवळ हे शिंदे गटात जाणार का ? याची चर्चा सुरू झाली असून, शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. केवळ शिवसेना (Shivsena) शिंदे गटच नाही तर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनीदेखील थरवळ यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, ही केवळ विचारपूस असून, कोणतीही ऑफर मला कोणत्याच पक्षाकडून आलेली नाही. मी शिवसैनिक आहे आणि शेवटपर्यंत शिवसैनिकच राहणार आहे.
आमच्या पक्ष प्रमुखांना अपेक्षित असलेले काम माझ्याकडून होत नाही, असे मला वाटते म्हणून मी हा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या काही चर्चा होत आहेत. सध्या तशा चर्चा 2010, 2015 ला राज ठाकरे ज्या वेळी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांना भेटलो असतादेखील रंगल्या होत्या. मात्र, तसे काही झाले नाही. मी गेले 43 वर्षे शिवसेनेत डोंबिवलीत काम करतो. त्यामुळे मी जिथे आहे तिथेच आहे. मी पदाचा राजीनामा दिला तरी मी शिवसैनिकच आहे आणि मी ठाकरे गटासोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्याकडे विधानसभेची तीन मतदारसंघ आहेत. त्यामध्ये कळवा-मुंब्रा, कल्याण ग्रामीण, डोंबिवली या तिन्ही ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे एकंदरीत दोन वेळा मी शहर प्रमुख होतो तिसऱ्यांदा देत होते, मी घेतले नाही. या लोकसभेला असलेले महत्त्व पुढच्या दृष्टीने म्हणून मला असे वाटले, की पक्षाला अपेक्षित असलेले काम माझ्याकडून होते नाही हेच यामागचे कारण आहे. कोणी काय चर्चा करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला अनेक वरिष्ठांचे फोन येऊन गेले आहे, असे ते म्हणाले.
थरवळ यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील युवा सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, अनेक शिवसैनिक अशाच पद्धतीने या नेतृत्वावर नाराज होते. त्याच शिवसैनिकांचे प्रतिनिधित्व करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा उठाव केला. कामे होत नाही, मानसन्मान दिला जात नाही, भेटी दिल्या जात नाही. त्यामुळे आजही काही शिवसैनिक नाराज आहेत. दसरा मेळावा आधी शिवसैनिक शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाळासाहेबांचे विचार घेऊन आमच्याकडे येण्याची शक्यता आम्हाला वाटते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जो उठाव केला आहे, त्याचा जो वणवा आहे, तो असाच पेटत राहणार. दुटप्पी राजकारण नेहमी होत राहिले आहे. अनेक चांगले शिवसैनिकांना डावलले जात आहे. त्यामुळे नाराजी तयार होत असते. पुढील काळात अनेक जुने शिवसैनिक शिंदे गटात येतील, असे म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षप्रमुख ठाकरे हे थरवळ यांचा राजीनामा स्वीकारतात, की पुन्हा त्यांची समजूत काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षवाढीसाठी ठाणे जिल्ह्यात थरवळ यांचा चेहरा महत्त्वाचा असल्याने त्यांच्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यात थरवळ शिंदे गटात प्रवेश करतात का हेही पाहावे लागणार आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.