Eknath Shinde, Amit Shah, 
Devendra Fadnavis
Eknath Shinde, Amit Shah, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : भाजपची आक्रमक वाटचाल, शिंदेंचं टेन्शन वाढवणार?

ज्ञानेश सावंत

Maharashtra Politics : भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या निवडणुकीत १४४ आमदार निवडून आणण्याचा इरादा उघडपणे केल्यानंतर शिंदे गट मात्र 'टेन्शन'मध्ये असल्याची चर्चा पसरली आहे.

त्यातच शिंदे गटातील एकाही आमदारांना शिवसेनेत घेणार नाही आणि त्यांचे अर्धे निम्मे आमदार भाजपमध्ये जातील, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटात देखील गोंधळ उडाला आहे. त्यामुळे भाजपची चाल आणि शिंदे गटातील अस्वस्थता व राऊत यांनी केलेले विधान पाहता राजकीय माहोल मात्र तापण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडत भाजप (BJP) आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने (शिंदे गट) सत्ता काबीज केली. त्यानंतर आगामी सर्व निवडणुकांत हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे सूतोवाच दोन्ही बाजुच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहेत. मात्र अशातच भाजपने विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) 'मिशन १४४' चा नारा दिला आहे.

या निवडणुकीत त्यांना एवढे आमदार निवडून आणायचे आहेत. यासाठी आखलेल्या मोहिमेचा दुसऱ्यातील टप्प्यातील प्रारंभ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांना बोलावून चंद्रपुरात घेतला. या मोहिमेचा गाजावाजाही केला. भाजपच्या उत्सवाची संधी साधून राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले.

'भाजपने १४४ आमदार निवडून आणले तर, शिंदे गटाचे आमदार काय धुणी-भांडी करणार? असा प्रश्न विचारत राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांना डिवचले. राऊत यांच्या बोलण्यावरून आरोप-प्रत्यारोप रंगत असतानाच अधिक आमदार निवडून आणण्याच्या भाजपच्या खेळीचा अंदाज बांधून असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांत देखील उलटसुलट चर्चा सुरू आहे.

'आपल्याला सत्तेपुरते सोबतीला ठेवून ऐन निवडणुकांत धोका होणार नाही ना?' असा प्रश्नही शिंदे गटाच्या आमदारांना सतावत आहे. यातच राऊतांच्या भाकिताची भर पडल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, शिवसेनेच्या ताब्यावरून ठाकरे-शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. याबबातची न्यायालयीन लढाई आणि लांबलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात शिंदे गट भाजपात विलीन होणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र त्यासाठी शिंदे गटातील सारेच आमदार राजी होणार नसल्याची चर्चा देखील आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) एका बैठकीत पुढच्या काळात स्वबळावर सत्ता आणण्याचा आदेशवजा आवाहन पक्षाच्या नेत्यांना त्यांनी केले होते. तेव्हा देखील शिंदे गट नाराज झाल्याचे दिसून आले होते.

मात्र, शाह असे काही बोलले नसल्याचा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिंदे गट एकत्र लढल्यास फाटाफूट होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

शिंदे गटाच्या एवढ्या आमदारांना सामावून घेताना वरिष्ठांची दमछाक होऊ शकते. त्यामुळे भाजपमध्ये आतापासूनच चिंचा व्यक्त करण्यात येत आहे. तर अशा एकत्रीकरणामुळे निवडणुकीत गोंधळ उडणार असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांने स्पष्ट केलेय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT