Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

अजित पवार यांनी केले सर्वात शेवटी मतदान पण वाढवलं काॅंग्रेसचे टेन्शन!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (MLC election 2022) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासोबत शेवटच्या तासात मतदान केले. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवाच्या पाश्‍र्वभूमीवर ही निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून पक्षाच्यावतीने संपूर्ण निवडणूक पवार यांनी आपल्या हाती घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपल्या दोन उमेदवारांना विजयी करण्यावर जास्त भर दिला होता. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे दोन्ही विजयी होतील, यासाठी अजितदादांनी फिल्डिंग लावली होती. खडसे यांच्या विजयात अडसर असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी खडसे यांनाच मते देण्याचा आदेश अजितदादांना दिला. दुसऱ्या क्रमांकाची मते ही आपल्याच उमेदवारांना दिली. तिसऱ्या पसंतीची मते ही काॅंग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांनी तर चौथ्या पसंतीच्या क्रमांकाची मते ही भाई जगताप यांना दिली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने जर काॅंग्रेसला दुसऱ्या पसंतीचीही मते दिली नसतील तर जगताप यांना विजय मिळविणे अवघड होऊ शकते, अशी चर्चा आहे.

शेवटच्या तासात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील, ठाकूर यांचे पुत्र क्षितीज ठाकूर तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान केले. पवार यांनी निवडणूक हाती घेतल्याने निवडणुकीत रंगत आली आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांबरोबरच अनेक अपक्ष आमदारांशी पवार यांचे वैयक्तिक संबध असल्याने भाजपातदेखील गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता होती.

आज सकाळपासूनच पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांचे मतदान ठरलेल्या योजनेप्रमाणे करून घेतले. आधी ठरल्याप्रमाणे पंसतीक्रमानुसार प्रत्येकाने मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आज सकाळी पुन्हा पक्षाच्या या सर्व आमदारांना पवार यांनी सूचना दिल्या. पक्षाच्या सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर स्वत: पवार व जयंत पाटील यांनी मतदान केले. २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांचे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदान पूर्ण केले.

अटकेत असलेले माजी मंत्री अनिल देशमुख व मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालय मतदानाची परवानगी देईल, या आशेने साडेतीन वाजेपर्यंत वाट पाहण्यात येत होती. मात्र, दुपारी साडेतीन वाजता या दोघांना मतदान करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीच्या आशा मावळल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT