Pawar Decline Borwankar's Allegations 
मुंबई

Pawar Decline Borwankar's Allegations : मीरा बोरवणकरांचे 'ते' आरोप अजितदादांनी फेटाळले, म्हणाले...

अनुराधा धावडे

Mumbai Polilitical News : माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात करण्यात आलेल्या काही उल्लेखामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. बोरवणकरांनी अजित पवार यांचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी कंसात एका ठिकाणी ‘दादा’ असा उल्लेख असल्याने अजित पवारांकडे अप्रत्यक्ष अंगुलीनिर्देश होऊ लागल, पण या सर्व प्रकरणावर स्वत: अजित पवार यांनी भाष्य करत बोरवणकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी एका निवृत्त  आयपीएस ऑफिसरच्या पुस्तकात काही उल्लेख आढळून आला, त्यानंतर माझ्यावर अनेकांनी गंभीर आरोप केले; पण बोरवणकरांच्या आरोपांशी माझा काही संबंध नाही. त्यांच्या आरोपानंतर मी स्वत: त्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे मी पुन्हा पाहिली.

याचवेळी त्यांनी या प्रकरणाचा तत्कालीन २००८ चा शासन आदेशही वाचून दाखवला. अजित पवार म्हणाले, त्यावेळी दिवंगत आर. आर. पाटील हे गृहमंत्री होते. मी पालकमंत्री होतो, पण मी फक्त आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत मी त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारला आणि त्यांनी नाही असे उत्तर दिल्यावर तो विषय तिथेच संपला. कामे रखडू नयेत म्हणून आढावा घेत असतो, पण आढावा घेतला म्हणजे निर्णय बदलला असे होत नाही. या प्रकरणात माझी कुठलीही सही नाही. पुस्तकात इतरही गोष्टी आहेत, मग माझ्यावरच फोकस कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

काय होते बोरवणकरांचे आरोप ?

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत, त्यांनी येरवड्यातील या प्रकरणावर भाष्य केले. पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना येरवडा इथली मोक्याची तीन एकर जागा ही जागा पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. तत्कालीन राज्य सरकारने पुणे पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली होती. माझ्याकडे कार्यभार असल्याने जमिनीवरील ताबा सोडण्याच्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेस मला देण्यात आले.  अजित पवार यांनीही यासाठी आग्रह धरला होता. येरवड्यातील ही जागा एका बिल्डरला देण्याचा निर्णय झाला होता, पण मी आयुक्त झाल्यानंतर ही जागा देण्यास विरोध केला.

 या जागेत पुणे पोलिसांचे कार्यालय आणि  याच ठिकाणी पोलिस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ही जागा पुणे (Pune) पोलिसांची आहे, भविष्याच्या दृष्टीने ही जागा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असे मी त्यांना सांगितले. पण सर्व प्रक्रिया झाली आहे,  त्यामुळे तुम्ही फक्त जागा हस्तांतरित करा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यावर सगळी प्रक्रिया झाली आहे, तर मग माजी आयुक्तांनीच जागा हस्तांतरित का केली नाही, असा प्रश्न मी विचारला, तर तत्कालीन गृहमंत्री म्हणाले होते मॅडम तुम्ही यात पडू नका, असेही बोरवणकरांनी या वेळी सांगितले.  

Edited By- Aanuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT