Thane News : दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४ येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनर लावण्यात आले होते. यावेळी सरकारनामाने ठाण्यात भाजपला गुगली; मुख्यमंत्री, अजितदादांचे बॅनर असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल अखेर अजितदादांच्या शिलेदाराला घ्यावी लागली.
स्पर्धेच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरच्या बाजूलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचे बॅनर लावावे लागले. भाजपने टाकलेल्या गुगलीत अजितदादांचाच शिलेदार अडकला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला (Najib Mulla) आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसेच देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. खऱ्या अर्थाने शनिवारी, १३ जानेवारी ते रविवारी २१ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेमध्ये राबोडी विभाग, ठाणे परिसरातील ग्रामीण भागातील 'एक गाव एक संघ' या संकल्पनेनुसार १६ संघ, ठाणे विभागामधील १५ संघ, कळवा-मुंब्रा परिसरातील ८ संघ, गुजरात, मुंबई, पुणे, पालघर, राजकोट, दिल्ली येथील ऑल इंडिया ओपन असे १२ संघ, तसेच ठाणे शहरातील पत्रकारांचा संघ, ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचारीवर्ग यांचा संघ, ठाणे शहरातील पोलिस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारीवर्ग यांचा संघ, डॉक्टर्स, वकील, महावितरणमधील अधिकारी-कर्मचारीवर्ग, राष्ट्रवादी काँग्रेसचा संघ, मराठी सिनेकलाकार यांचा संघ आणि टीम नजीब मुल्ला म्हणून सहकाऱ्यांचा संघदेखील सहभागी होणार आहेत.
शनिवारी, १३ ते मंगळवारी, १६ जानेवारी या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातील संघांचे सामने, बुधवारी, १७ जानेवारी रोजी प्रदर्शनीय सामने ज्यामध्ये ठाणे विरुद्ध रायगड आणि टेनिस क्षेत्रातील नामांकित महिला क्रिकेट संघांचे सामने हे मुख्य आकर्षण असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
१८ ते २० जानेवारी या कालावधीत ऑल इंडिया ओपन संघाचे सामने आणि २१ जानेवारीला अंतिम सामने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे (Shrikanat Shinde) तसेच इतर प्रमुख मान्यवरही भेट देणार आहेत.
एकीकडे राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गट, तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र आहेत. तिन्ही पक्ष प्रत्येक कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे नाव आणि फोटो वापरले जात आहेत. पण, अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले मुल्ला यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींचे बॅनर लावले होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे बॅनर सोडा, फोटोही लावण्यास कसे विसरले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांनी वेळीच चूक सुधारली खरी. पण याचदरम्यान त्यांना पक्षाच्या वरिष्ठांनी तंबी तर दिली नाही ना ? याची चर्चा जोरात सुरू आहे.
(Edited by Sachin Waghmare)