Mumbai News : लोकसभेची निवडणूक अजित पवार यांच्या अस्तित्त्वाला धक्का देणारी ठरली. महायुतीचा लोकसभेत जोराचा धक्का बसला अन् त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची एकच जागा निवडून आली. राजकीय निरीक्षकांनी देखील अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
परंतु स्वभावाने फटकळ असलेल्या अजितदादांनी लोकसभेतील कामगिरीनंतर स्वतःमध्ये बदल केला अन् थेट जनतेमध्ये घुसले. सर्व नकारात्मक मुद्यांवर मात केली आणि विधानसभा निवडणुकीतून राज्याच्या राजकीय पटलावर जोरदार कमबॅक केले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रखर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकीय वाटचाल करणाऱ्या भाजप आणि शिवसेनापक्षाच्या महायुतीत तब्बल 41 जागा जिंकल्या.
अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीला 1980 मध्ये सुरवात झाली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते दुसऱ्या क्रमाकांवरचे नेते होते. राजकीय वाटचाल करताना ते 1982 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे सदस्य झाले. यानंतर 1991 मध्ये बारामतीमधून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर ही जागा त्यांनी कायम ठेवली आहे.
राज्याच्या राजकारणात आघाडी, युतीच्या राजकारणात अजितदादांनी तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद संभाळले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि अजितदादांचा दबदबा असताना, 2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादीने 78 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती. शरद पवार यांनी आघाडीत मंत्रिपदाची अधिक खाते मिळवण्यावर भर दिला. त्यामुळे अजितदादांची ही सधी हुकली.
अजित पवार यांची राजकीय वाटचालीत अनेक मुद्यांनी गाजली. परंतु 2102मध्ये त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली. 2019मध्ये त्यांना आणखी एक धक्का बसला, तो म्हणजे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांनी सकाळचा शपथविधी घेतला. हे सरकार पुढे 80 तासांत कोसळले. यानंतर अजितदादांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आणि शरद पवार यांची 2023 मध्ये साथ सोडली.
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीशी हातमिळवणी केली आणि सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्या हा निर्णय म्हणजे, राजकीय करिअरशी खेळ असल्याचे निरीक्षक काही राजकीय विश्लेषकांनी नोंदवले. यातच लोकसभा 2024 च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला जोराचा धक्का बसला. या निवडणुकीत अजित पवार यांना एकच जागा जिंकता आली. त्या पराभवातून सावरण्यासाठी अजितदादा थेट मैदानात उतरले.
अजितदादा तसे फटळक नेते, कधी काय समोरच्या बोलतील, याचा नेम नाही. या स्वभावाला त्यांनी मुरड घातली आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी जनतेच्या दारात गेले. याचा फायदा अजित पवार यांना झाला. राजकीय नेतृत्व उजळले आणि त्यांच्या ४१ जागा निवडून आल्या. विशेष म्हणजे, अजित पवारांनी ही सर्व किमया प्रखर हिंदुत्वाच्या मुद्यावर वाटचाल करणाऱ्या भाजप आणि शिवसेना पक्षाबरोबर राहून केली.
भाजप आणि शिवसेनेने या निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'एक तो सैफ है', अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला गोंधळ उडाला होता. यात गोंधळ, वादात अजित पवार अडकून पडले नाहीत, उलट आपली आणि आपल्या पक्षाची सर्वव्यापक भूमिका जपली. यामुळे अजित पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला प्रभाव वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.