Assembly Session News
Assembly Session News Sarkarnama
मुंबई

Assembly Session : बिनासहीचं पत्र आलं की, आपण ओळखायचं की अजिदादाचं पत्र आलंय : शिंदेंनी उघड केले गुपित

Vijaykumar Dudhale

मुंबई : ‘अजितदादा म्हणाले की, ह्यांनी सचिवाच्या सहीचा जीआर (परिपत्रक) काढला. पण, तुम्ही (अजित पवारांना उद्देशून) तर पत्रावर सहीच करत नाही. बिना सहीचं पत्र देता. बिना सहीचं पत्र आलं की, आपण धरून चालायचं की बाबा, अजितदादांचं पत्र आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्राबाबत भाष्य केले. (Ajit Pawar's letter has no signature : Chief Minister Eknath Shinde)

राज्यपालांच्या अभिषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (ता. ३ मार्च) विधानसभेत उत्तर दिले. या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यात त्यांनी कोणालाही सोडले नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण रोख अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर होता.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अजितदादा म्हणाले की, ह्यांनी सचिवाच्या सहीचा जीआर (परिपत्रक) काढला आहे. पण, आमच्याकडे एवढी पत्रं येतात. एवढी लोक येतात. आम्ही त्याच्यावर शेरो मारतो. माझ्याकडे एखादा आमदार आला आणि त्यांच्या पत्रावर मी काही लिहिलेच नाही तर तो म्हणेल की, ह्याच्यापण पेनाला लकवा मारला की हाताला लकवा मारला आहे. अगोदरचे लोक (मागील मुख्यमंत्री) तर खिशात पेनच ठेवत नव्हते. (तेवढ्यात सत्ताधारी बाजूने ‘एवढ्या सह्या केल्या आहेत की रेकॉर्ड ब्रेक’ अशी कमेंट केली) एवढ्या सह्या केल्या आहेत.

आता त्या तपासल्या पाहिजेत. ते तर जाऊद्या. पण, तुम्ही (अजित पवारांना उद्देशून) तर पत्रावर सहीच करत नाही. बिना सहीचं पत्र देता. ते कशाला, ते काय आहे? (शेजारच्या बाकीवरील राष्ट्रवादीच्या आमदारांना तुम्हाला माहिती आहे का नाही, अशी विचारणाही मुख्यमंत्र्यांनी केली) दादांची पत्रावर सहीच नसते. आपण धरून चालायचं की बाबा, अजितदादांचं पत्र आहे. जे खरं आहे ते खरंय. आता त्यावर करतो आपण सह्या. शेरे मारावे लागतात, कारण तेवढं समाधान असतं लोकांचं. पुढे त्याची फाईल तयार हेाते, असेही शिंदेंनी नमूद केलं.

तुम्हाला माहिती होतं की आता चाललोय आम्ही (गुवाहाटीला). जातोय आम्ही, याची तुम्हाला खात्री पटली होती. जाता जाता तुम्ही अशा सह्या करून टाकल्या की, जिथं दोन हजार कोटी रुपयांची तरतूद होती, तिथं सात हजार कोटींच्या ‘वर्क ऑर्डर’ देऊन टाकल्या. (तेवढ्यात विरोधी बाकावरून ‘तुम्हीही सरकारमध्ये होता’ असे कोटी केली. त्यावर मुख्यमंंत्र्यांनी तिथं काय माझा संबंध आहे, अशी विचारणा केली. (त्यावेळी ते तिकडं गुवाहाटीत होते, अशी पुष्टी फडणवीस यांनी जोडली). मी त्या वेळी तिकडे (गुवाहाटीला) होतो.

मी सरकारमध्ये असतानाही माझे ८०० कोटी रुपये दादा तुम्ही घेतले ना. (त्यावर अजित पवारांनी सांगून टाकलं आपलं तसं ठरलं होतं, त्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यासह सर्व सभागृहात हास्यात बुडाले) ज्यांना स्थगिती दिलेली आहे, ती प्राधान्यक्रम ठरवून उठविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT