Ajit Pawar and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Elections : अजित पवारांची लोकसभेसाठी 'पावरफुल' रणनीती; शिंदे गटाची धडधड वाढवणार!

Ajit Pawar and Eknath Shinde News : ... यामुळे महायुतीमधील घटक पक्षात भविष्यात तणाव निर्माण होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा!

Mayur Ratnaparkhe

Mahayuti News : ट्रिपल इंजिनाच्या सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची सध्याची रणनीती पाहता, आगामी निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला त्यांच्याकडून धक्का बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार (Ajit Pawar) हे महत्वाकांक्षी राजकारणी असून त्यांची राजकीय सारीपटलावरील एकूणच इच्छा कधीच लपून राहिलेली नाही.

कारण आता त्यांचे लोकसभेच्या त्यांच्या ताब्यातील चार जागांव्यतिरिक्त शिंदेंच्या जागांकडेही लक्ष असल्याचे दिसत आहे. हा मुख्यमंत्री शिंदेंना विचार करायला लावणारा मुद्दा असू शकतो. मात्र सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा शिंदे गटातील कोणत्याही नेत्याकडून यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे त्यांचा सावध पवित्रा दिसत आहे. दरम्यान, महायुतीमधील घटक पक्षात यामुळे भविष्यात वाद निर्माण होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज एका कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सूचक विधान केलं. आपल्या ताब्यातील मतदारसंघा व्यतिरिक्त अन्य मतदारसंघातूनही लढण्याची तयारी दर्शवली. खरंतर शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी आगामी लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची असणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंवर त्यांच्याबरोबर आलेल्या १३ खासदारांना पुन्हा निवडून आणण्याची मोठी जबाबदारी आहे.

ठाणे आणि मुंबईचा अपवाद वगळता शिंदे गटाची राज्यात एवढी ताकद दिसून येत नाही. दुसरीकडे युतीलमधील मोठा भाऊ भाजपला सुद्धा याचा अंदाज आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जर अजित पवारांनी भविष्यात शिंदेंच्या मतदारसंघात ताकद जोर लावला, तर ते एकप्रकारे भाजपला राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरू शकते, असं काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

एकीकडे भाजपने राज्यभर निवडणुकांसाठी चाचपणी केली असून यात त्यांना अपेक्षित यश तूर्तास तरी दिसत नाही. उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल अद्यापही जनतेमध्ये सहानभूती जाणवते. महाविकास आघाडीच्या साथीने उद्धव ठाकरे महायुतीचं टेंशन वाढवू शकतात, असे चित्र आहे.

हे सगळे पाहता लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकू हे भाजपचे लक्ष्य दिवास्वप्न ठरू शकतं. यामुळे शिंदे शिवसेनेची ताकद कमी पडत असेल तर अजित पवार यांच्या मदतीने लक्ष्याचा जवळपास जाण्याचा भाजपचा विचार असू शकतो. या पाश्वभूमीवर शिंदे यांच्यासह भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही आणि हे सूचक मौन बरेच काही सांगून जाणारे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT