Shahaji Bapu Patil News, Maharashtra Political Crisis News,
Shahaji Bapu Patil News, Maharashtra Political Crisis News,  Sarkarnama
मुंबई

`अजितदादा, जयंत पाटील तुम्हाला नाही माहिती : मी 157 नव्हे 300 कोटी नेले`

सरकारनामा ब्युरो

मुंबई - सांगोल्याचे शिवसेना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील ( Shahaji Patil ) हे त्यांच्या काय झाली... काय डोंगर... व कोणी आणला नाही एवढा निधी मी मतदार संघात आणला.. या डायलॉगने राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यांची एका खासगी वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी राज्यातील मंत्र्यांचे निधी त्यांच्या मतदार संघात कसे गपचूप आणले याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. Shahaji Bapu Patil News Update

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना खूप मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप केला होता. भाजपनेही आपल्याला काय आश्वासने दिली असे विचारले असता यावर आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, हा राजकारणाचा भाग आहे. त्यांनी ओळखले की हे गेले म्हणजे परत येणार नाहीत. म्हणून आम्हाला बदनाम केले जात आहे. सुडाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे यांना पैसे मिळाले, पदे मिळाली असे आरोप होत आहेत, असे त्यांंनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, 1974 साली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदा मंत्रालयात गेलो. एवढ्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी एवढ्या कालच्या पातळीचे राजकारण व एवढे घाणेरडे वाक्य राज्याच्या राजकारणात कधीच आले नाहीत. आमच्या बरोबर चार महिला आमदार होत्या. त्या आमच्या बहिणी आहेत. असे असताना त्यांनी अलिबागच्या भाषणात आरोप केले की, का गेले तिकडे. जा तिकडे जाऊन पाट्या लावा. कामाठीपुऱ्याच्या ओळीला थांबा. राज्याच्या राजकारणात असे कधी घडले नव्हते. त्यांनी प्रेत येतील असे म्हंटले. ते केवळ वातावरण निर्मितीसाठी. ते एका बाजूने म्हणतात अजूनही परत या. आणि दुसऱ्या बाजूने म्हणतात यांची प्रेत आणतो मग नेमका निर्णय काय घ्यायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

माझा प्रसिद्ध झालेला ऑडिओ व व्हिडिओ दोन्ही खरे आहेत. आणखी खरे सांगतो, अजित पवारांनी व जयंत पाटलांनी माझ्या निधीचा आकडा 157 कोटी रुपये सांगितला. मी खरे तर 300 कोटी रुपये नेले हे मंत्री अजूनही त्यांना माहिती नाही. असे आमचे आडाणी मंत्री! काय कळतं यांना राजकारणातलं. मी एवढा चोरटा वेगळा वेगळा निधी नेला. छगन भुजबळांचा साडेसहा कोटी निधी माझ्या गावाकडे गोडाऊन बांधायला नेले. सर्व कार्यालये एकत्र असली पाहिजेत यासाठी अशोक चव्हाण यांचे 16 कोटी रुपयांचा निधी गपचूप नेला. हे कुणालाच माहिती नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा मला 60 ते 70 कोटीचा निधी मिळाला. मात्र 1500 कोटी रुपये निधी झाला बारामतीचा. 750 कोटी रुपये निधी झाला रोहित पवारांचा, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी निधी कितीतरी. ही तफावत कशासाठी? राज्यात निधीची कमतरता आहे. तुम्ही राज्यकर्ते आहात. आम्ही आमदार आहोत मग निधीचे समान वाटप करा. भाजपलाही निधी द्या. तेही महाराष्ट्रातलेच आहेत ना. ते आपलेच मराठी माणसं आहेत.

हे निधी वाटप करायला लागले तर भाजप पाच कोटी, काँग्रेस 40 कोटी, राष्ट्रवादी काँग्रेस 60 कोटी आणि शिवसेना मिळेल तेवढेच. या तफावती बाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो. दोन महिन्यापूर्वी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीतही मी हेच सांगितले होते. त्यावेळी बंडखोर आमदारांपैकी नऊ जण हजर होते. आम्ही आमदारांच्या निधीचा आकडा वाचून दाखविला. विचारले काय करायचे. मग मी म्हणालो मला बारामतीचा आकडा वाचून दाखवा. रोहित पवारांच्या, जयंत पाटलांच्या मतदार संघातील निधीचा आकडा वाचून दाखवा. मग आमच्या निधीचा आकडा वाचा, असे मी सांगितले. एक किलोमीटर रस्ता करायला 70 लाख रुपये खर्च येतो. 10 कोटीत 12 ते 13 किलोमीटरच रस्ता होतो. आम्हाला 500 किलोमीटर रस्ता करायचा आहे. आमच्या वाड्या वस्त्या अजूनही मागासलेल्या आहेत. राज्यातील मागास तालुक्यात आमच्या तालुक्याचे नाव आहे. कोकण व विदर्भापेक्षाही मागास आहोत असे त्यांनी सांगितले.

निधी आणल्यावर श्रेयवाद. म्हणून मी माझ्या मतदारांसमोर सर्वाधिक निधी आणल्याचा डायलॉग आहे. पक्ष पाहून निधी वाटप करणार असाल तर कसे व्हायचे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बंडखोरी बाबत शहाजीबापू पाटील म्हणाले, या उठावात पहिला झटका दिला तो मानदेशाने. सुरतेला पोचलेले पहिले आमदार म्हणजे शंभुराज देसाई व शहाजीबापू पाटील. उठावाची ठिणगी पडली ती शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT